शाहु महाराज जयंती ( 150)

 जन्म : २६ जुन १८७४ मृत्यु : ६ मे १९२२


न भूतो ना भविष्यती असा हा राजा होऊन गेला.

लोककल्याणासाठी जे कार्य महाराजांनी केले, त्याला खरंच तोड नाही. भल्याभल्यांना जे जमलं नाही, त्या काळात ते काम या अवलियाने करून दाखवले. लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांना म्हटले जाते, ते असेच नाही. इतर राजे इतिहासजमा झाले, पण हा राजा शिवरायांच्या नंतर आजसुद्धा लोकांच्या हृदयात खोलवर रुतून बसला आहे. आणि येणाऱ्या शेकडो वर्षांपर्यंत महाराजांचे स्थान कायम हृदयात असेल.

जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, राखीव जागा ठेवण्याचा कायदा, पुनर्विवाहसंबंधी कायदा, काडीमोडसंबंधी कायदा, आणि इत्यादी वेगवेगळे कायदे त्यांनी आपल्या प्रांतात केले होते. या सोबत सक्तीचे मोफत शिक्षण, दलितांना शिक्षण, वसतिगृहाचे निर्माण, आरक्षणाची तरतूद, जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न, शेती, पाणीपुरवठा, उद्योगधंदे निर्माण करणे आणि इत्यादी असंख्य समाज उपयोगी कार्य या राजाने त्या काळी करून ठेवले होते. जे आजसुद्धा असंख्यांना करायला जमत नाही. त्यांच्या महान विचारांची गरज आज आपल्या समाजाला आहे. विषमता पेरणाऱ्या युगात समता पेरणारा हा राजा खूप महान होता.

     "महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे. लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजेत.” 

...सांगलीचे लै फेमस वकील गणपतराव अभ्यंकर एकदा राजर्षी शाहू महाराजांबरोबर रथातनं चाललेवते. बोलता-बोलता त्यांनी महाराजांना सुनावलं.

...शाहू महाराज सत्तेवर येण्याआधी नोकरीतल्या सगळ्या वरच्या, महत्त्वाच्या जागा सधन उच्चवर्गीय लोकांनाच दिल्या जायच्या. महाराजांनी मात्र खालच्या-अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मोठ्या पदाच्या नोकर्‍या द्यायला सुरूवात केली होती. त्यावर नाराज होऊन गणपतरावांनी हा आरोप केला होता.

...महाराज गप्प बसले. काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेला. नोकराला म्हन्ले, "चंदी आन रं." त्यानं आणलेले हरभरे महाराजांनी एका जाजमावर टाकले. त्याबरोबर हरभरे खायला सगळी घोडी पळत आली. जी दांडगी, तगडी होती, ती लहान, अशक्तांना मागं सारून पुढं घुसली. शिंगरं आन् म्हातारी मागं र्‍हायली. त्यांना खायला चंदी मिळालीच नाही. महाराज म्हन्ले, "बघितलंत का अभ्यंकर, जी चलाख, दांडगी आणि 'लायक' होती त्यांनीच समद्या चंदीचा फडशा पाडला. लहान, रोगी आनि अशक्त उपाशीच र्‍हायली का नाय? म्हनून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो. तसं चारल्याशिवाय ती सशक्त हुनारंच न्हाईत... मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला, तुमच्यासारख्यांच्या बरोबरीला आनायला काय करायला पायजे? खास सवलती नको का द्यायला???

अशा विचारांचा राजांचा राजा, लोकराजा सत्तेवर असताना गोरगरीबांना काय कमी पडणार होतं? आवो, इतिहासात कधी झाली नसंल अशी क्रांती झाली. माझ्या शाहूच्या राज्यात उच्चवर्गीयांच्या मांडीला मांडी लावून बसून अस्पृश्य - बहुजनांतील मुलंमुली शिक्षण घ्यायला लागली !

...फासेपारधी-मातंग-गारूडी समाजातल्या लोकांना राजदरबारी नोकर्‍या दिल्या गेल्या. त्यांना कामधंदे सुरू करायला शाहूराजांनी खिशातले पैसे दिले !

...जातीभेदाची कीड नष्ट करायला आंतरजातीय विवाह लावले गेले...विधवाविवाह-स्त्रियांना शिक्षण, त्यांचे सबलीकरण यावर भर दिला गेला !

कोवळ्या वयाच्या भिमरावामधनं, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं भारतरत्न घडवण्यात शाहूमहाराजांचा सिंहाचा वाटा होता ! "शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. ते सामाजिक लोकशाहीचे खरे आधारस्तंभ होते." असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ते उगाच नाही.

या देशातला समतेचा पाया भक्कम करणार्‍या महामानवाला मानाचा मुजरा !

- किरण माने.

हा असा महान राजा पुन्हा होणे नाही.♥️🌼

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)