अण्णा भाऊ साठे जयंती

 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना खूप खुप शुभेच्छा 💙


कामगार,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,दलित/वंचित आणि दिनदुबळ्यांचे प्रश्न आणि कष्टमय जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे अण्णाभाऊ साठे हे अनेक बाबतीत महान ठरतात.फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णांभाऊंनी ३५ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,८ पटकथा,१ प्रवासवर्णन,३ नाटके,१० पोवाडे व १४ लोकनाट्ये आणि १२ उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ लिखाण करून समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलंय..अण्णाभाऊ साठे यांचे जीवन एकंदरीत खूपच संघर्षमय/कष्टमय होते.संघर्षाचे दुसरे नावच अण्णाभाऊ साठे होते असे आपण म्हणू शकतो कारण त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष हा शब्दांत मांडता येण्यासारखा नाही अथवा दुःख जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता..दुःखाची सुद्धा एक मर्यादा असते पण अण्णाभाऊच्या आयुष्यात ही म्हण अजिबात लागू होत नाही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या मागे दुःख हे लागलेलेच होते.संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते.त्यांचे एकंदरीत जीवन हे जीवन नसून मरणच अधिक होते..त्यांचे दुःख हे त्यांच्या मृत्यूसोबतच संपले !! आयुष्यात कधीही संघर्षाची जाणीव करून घ्यायची असेल,संघर्ष म्हणजे नेमके काय हे जाणून घ्यायचे असेल तर एकदा अण्णाभाऊ साठे अभ्यासून पाहावे...


प्रत्येक माणसाला मुक्तपणे जगता यावे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला,आपली व आपल्या कुटुंबाची काळजी न करता त्यांनी फक्त समाजातील दिंनदुबळ्यांबद्दल विचार केले कारण त्यांनी समाजातील या दिंनदुबळ्यांचे कष्टमय जीवन हे अगदी जवळून पाहिले व अनुभवले होते.यांचे संताप,चीड, दुःख,यातना हे सर्व अण्णाभाऊना स्वतःचेच वाटत असे आणि यांचीच व्यथा त्यांच्या साहित्यात उतरली होती.त्यांचे लिखाण हे काल्पनिक नसून वास्तविकतेला धरूनच होते.त्यांच्या लेखणीने कामगार,कष्टकरी,गरीब वर्ग हा एकंदरीत पेटून उठायचा.त्यांचा लढा हा जातीयभेद/वर्णभेद/वर्गभेद/गरिबी/बेरोजगारी/शोषणा विरुद्ध होती.त्यांना विषमतेवर आधारित समाज व्यवस्था नको होती त्यांना समता हवी होती आणि यासाठीच त्यांचा संघर्ष हा शेवटपर्यंत सुरू होता..केवळ ४८ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या साहित्यरत्नाने आपल्या आयुष्यात जे काही लिखाण केलं ते फक्त आणि फक्त झोपलेल्या समाजाला जागवण्यासाठीच.त्यांनी केलेले लिखाण आज अनेकांना प्रेरणा देऊन संघर्ष करण्यासाठी,शोषण व अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला प्रेरित करत असतो आणि हीच त्यांच्या साहित्याची ताकद आहे जी दीर्घकाळ टिकणार यात तिळमात्र शंका नाही..अण्णाभाऊ आज सुद्धा त्यांच्या साहित्यात जीवंत आहे आणि नेहमी राहणार ...


अण्णाभाऊंच्या जन्मापासून तर त्यांच्या शेवटपर्यंत दृष्टिक्षेप टाकल्यावर लक्षात येते की त्यांचे एकंदरीत जीवन हे किती पटीने संघर्ष व दुःखमय होते..जे वाचून/ऐकून माणूस अक्षरशः रडल्याविना राहूच शकत नाही.त्यांच्या जीवनचरित्रापासून आपण खूप काही शिकू शकतो.अण्णाभाऊ साठेचा जन्म,कष्टमय बालपण,बालपणातील कष्ट,शिक्षणासाठी समाजाने उभी केलेली अडचण,दारिद्र्य/गरिबी,शिक्षण सोडणे,गाव सोडून कुटुंबाच्या सोबत पायदळ मुंबई येथे प्रवास,मुंबईत सुरुवातीला मिळेल काम करणे व नंतर गिरणीत गिरणी कामगार,वाचन व लिखाणाची आवड निर्माण होणे व त्यासाठी केलेली मेहनत,मार्क्सवादी/कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव,लालबावटा पथक सदस्य,नवीन मित्र मिळणे,रशियाचा प्रवास,मुबलक लिखाण,उपेक्षा,एकटेपणा आणि शेवटी दुर्दैवी निधन पर्यतचा प्रवास वाचल्यावर अंगावर काटा येतो आणि धायमोकळून रडावं अस वाटायला होते..एवढ्या मोठ्या साहित्यसम्राटाची अशी उपेक्षा ही मात्र कदापिही सहन होत नाही आणि होणार नाही..


©️Moin Humanist✍️

Comments

Popular posts from this blog

MPSC. Material

Hall Ticket Exam, 2024