प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
ग्रंथ परिचय
डॉ. प्रकाश आमटे यांचे 'प्रकाशवाटा'
'प्रकाशवाटा' हे डॉ. प्रकाश आमटे यांचे गाजलेले पुस्तक आहे. चोहीकडे दिशा अंधारल्या असतांना वाट दावणारे आहे. प्रेरणा देणारे आहे जगण्याच्या दिशा बदलवणारे आहे. हे पुस्तक कोणालाही व्यक्तिगत आयुष्यात रममान न होता स्व-परीघापलीकडे बघायला लावणारे आहे. या पुस्तकामुळे महाराष्ट्रात अनेकांना झपाटले आहे. समाजकार्याचे छोटे मोठे प्रयोग ठिकठिकाणी उभे राहत आहेत. हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे. जाणून घेऊया आज 'पुस्तकांचे जग' मध्ये 'प्रकाशवाटा' या पुस्तकाविषयी..
बाबा आमटे व्यवसायाने वकील होते. 1942 साली महात्मा गांधीजींचे विचार ऐकून ते बदलले. त्यांनी वकीली व्यवसाय सोडून कुष्ठरोग्यांसाठी काम करायला सुरुवात केली. कुष्ठरोग्यांची सेवा म्हणजे त्याकाळी साधी गोष्ट नव्हती. कारण कुष्ठरोग्यांना समाज टाकून देत होता. नाकारत होता. तिरस्कार करत होता. या रोगाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज होते. बरेचसे अजूनही आहेत.
अशा टाकून दिलेल्या आणि नाकारलेल्या लोकांसाठी बाबा आमटे यांनी आपले आयुष्य खर्च केले. कुष्ठरोग्यांची सेवा एवढेच त्यांच्या कामाचे स्वरूप नव्हते तर पीडित व्यक्तींना सामान्य माणसाइतका आत्मविश्वास देणे हे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. आनंदवनची ख्याती यामुळे देश विदेशात कायम आहे. बाबा आमटे यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तिथल्या श्रम संस्कार शिबिराने अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या जगण्याला आकार आणि आशय दिला. बाबा आमटे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटे यांनीही समाजकार्याचा वसा चालवीला आहे.
'प्रकाश वाटा' हे डॉ. प्रकाश आमटे यांचे गाजलेले पुस्तक. हेमलकसा या ठिकाणी 'लोक बिरादरी' प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेची आणि एकूणच आनंदवनापासून हेमलकसापर्यंतच्या संघर्षपूर्ण प्रवासाचे वर्णन यात आहे. आमटे परिवाराची तिसरी पिढी सुद्धा आज हाच वारसा पुढे चालवत आहे. आज आनंदवन असो की हेमलकसा, दोन्हीही प्रचंड बहरलेले दिसतात परंतु या निर्मितीच्या पाठीमागे किती कष्ट, किती अडचणी आणि आव्हाने होती हेच या पुस्तकातून कळते.
मराठी भाषेतील हे पुस्तक 2009 साली प्रकाशित झाले आहे. आजवर या पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निघाल्या आहेत. समकालीन प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकावरील कंदील हातात घेतलेला प्रकाश आमटे यांचा फोटो वाचकांना जणू प्रकाश वाटच दाखवत आहे. सुंदर मांडणी, मध्ये मध्ये फोटोग्राफ्स आणि साधी भाषा यामुळे हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवते. छोट्या छोट्या प्रकरणांमुळे वाचकास वाचताना मजा येते. मॅगसेसेचा आनंद वनातले दिवस, आनंदवना बाहेरच्या जगात, मुक्काम हेमलकसा, अखेर हेमलकशानं स्वीकारलं!, कसोटीचे प्रसंग, विस्तारती वैद्यकीय सेवा, जीवावरचे प्रसंग, शाळेची सुरुवात, अनोखे प्रयोग, प्राण्यांचे गोकुळ, पुढची पिढी, समाजमान्यता, जगन्नाथाचा रथ आणि समारोप अशी ही प्रकरणे या पुस्तकामध्ये आहेत. समकालीन प्रकाशनाच्या वतीने या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर हेमलकशाच्या प्रकल्पासाठी काम करण्याची तयारी असलेल्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी यथाशक्ती आर्थिक मदत करावी असेही त्यांनी आवाहन केले आहे.
लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला 1973 साली. वयाच्या 22 व्या वर्षी डॉ. प्रकाश आमटे यांनी वैद्यकीय शिक्षणानंतर तिथे प्रॅक्टिसला सुरुवात केली. सतरा वर्षे हेमलकशात वीज नव्हती. घनदाट जंगल आणि वन्य प्राण्यांचा सहवास यामुळे सारं काही भयंकर होतं. दळणवळणाची साधने नसल्यामुळे सहा सहा महिने नागरी जगाशी हेमलकशाचा संपर्क तुटलेला असायचा. अशा प्रतिकूल काळात न थकता, न डगमगता डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी इतिहास घडविला.
या प्रकल्पाला या वर्षी नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेने सुवर्ण महोत्सवी साजरा केला आहे. त्यानिमित्त हेमलकशाला कार्यक्रम घेण्यात आला होता. आज हेमलकशाला मोठे हॉस्पिटल आहे. निवासी शाळा आहे. सोबतच प्राणी संग्रहालय आहे. विविध देशातील मान्यवरांनी आजवर इथे भेटी दिल्या आहेत. डॉ. प्रकाश आमटे यांच्यावर मराठीमध्ये एक सिनेमा देखील येऊन गेला आहे. आशिया खंडातील नोबेल पारितोषिक म्हणून समजल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने 2008 साली डॉ. प्रकाश आमटे यांना गौरविण्यात आले आहे. आहे विशेष म्हणजे या आधी बाबा आमटे यांना सुद्धा 1985 साली हाच पुरस्कार मिळाला होता. वडील आणि मुलगा या दोघांना एकच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा विलक्षण योगायोग आणि त्यांच्या कार्याचा गौरव आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी उभारलेला लोकबिरादरी प्रकल्प काय आहे? हे या पुस्तकातून कळते. वाचकांनी ते नक्की वाचावे. आणि प्रत्यक्ष बघावे सुद्धा.
हेमलकशाला जाण्यासाठी चंद्रपूर वरून आलापल्ली ला जावे लागते. पुढे भारामरागड जाणाऱ्या बसेस हेमलकसा वरूनच जातात. भामरागड हा गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका. इथे मोठे वनक्षेत्र आहे. विशेष हे की 1970 साली बाबा आमटे यांनी परिवारासहित भामरागड ला भेट दिली होती. तिथून परत येताना त्यांनी 'आता आनंदवन प्रकल्प मार्गी लागला आहे त्यामुळे आता तुम्ही आदिवासींसाठी भामरागड मध्ये काम करावे' अशी आपल्या डॉक्टर मुलांना गळ घातली. त्यानुसार डॉ. प्रकाश आमटे यांनी आणि वैद्यकीय शिक्षणानंतर हेमलकशाला वैद्यकीय सेवेचा प्रारंभ केला. डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे या दांपत्याचा हा प्रवास म्हणजेच 'प्रकाशवाटा' आहे. प्रवास खरोखरच आश्चर्यकारक आहे. सुरुवातीला त्यांचा मुक्काम एका झाडाखाली होता. पुढे एका झोपडीत राहून त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. हेमल कशात तेव्हा रस्ते, वीज, पाणी याची कसली सोय नव्हती. ज्यांच्यासाठी हे सेवाकार्य सुरू केले त्या आदिवासींची भाषा कळत नव्हती. आदिवासींमध्ये प्रचंड अंधविश्वास असल्यामुळे त्यांचा वैद्यकीय सेवांवर विश्वास नव्हता. झाडावरून पडून हातपाय मोडणे, मलेरिया, अस्वल, वाघाचा हल्ला, कुपोषण, बालमृत्यू आणि ॲनिमिया हे त्यांचे प्रामुख्याने आजार असत. त्यावर ते अंगारे दुपारी करीत. झाडपाल्याचा उपचार करीत. सरकारी दवाखाना उपलब्ध नव्हता. अशा विपरीत परिस्थितीत डॉ. प्रकाश आमटे यांनी समाजकार्य प्रारंभले. नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. प्रत्येकाने ते जरूर वाचले पाहिजे.
- रवींद्र साळवे, बुलढाणा
मो. 9822262003
Comments
Post a Comment