शहीद भगतसिंग समग्र वाडमय

 शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग (मोईन)

भारतमातेला पडलेलं एक अभूतपूर्व स्वप्न.. ज्याच्याविषयी वाईट बोलणे ना नेहरुवाद्यांना जमलं, ना गांधीवाद्यांना जमलं, ना कट्टर इस्लामवाद्यांना आणि ना हिंदुत्ववाद्यांना... ‘हा आमचा आहे’ असे सांगायला आजही, एकमेकाविरुद्ध विचारसरणीची माणसे भांडतात.. मृत्युपश्चात ९० वर्षे उलटली असली तरी आजसुद्धा तरुणांना देशप्रेमाची अत्युत्तम भाषा शिकविणारा महान क्रांतिकारक..... इतकंच कशाला, फाळणीपश्चात भारत आणि पाकिस्तान या शत्रूराष्ट्रांमध्ये, जिथे एक विचार देखील समान नाही तिथे, आजही, २३ मार्चच्या दिवशी ज्याचं एकत्र सन्मानपूर्वक स्मरण केलं जातं असा एकमेवाद्वितीय स्वातंत्र्यसेनानी…


भगतसिंगांशी माझा परिचय जुना आहे. माझ्या ओपीडीमध्ये त्यांचा फोटो पाहून अनेकजण मला विचारतात, “हा इथे कसा?” मी फक्त स्मितहास्य करतो. मलाच माहित नाही मी कसा त्यांच्या प्रेमात पडलो? मग त्यांना काय सांगणार?  ती पूर्ण कहाणी इथे सांगणे सुद्धा शक्य नाही. तूर्तास फक्त प्रयोजनाला धरूनच बोलेन.  माझे मित्र मला नेहमी विचारतात, ‘भगतसिंगांविषयी चांगली पुस्तके सांगा.’  त्या अनुषंगाने इथे बोलणार आहे आज.

*‘भगतसिंग म्हणजे कोण?’ हा प्रश्न स्वतःला विचारून बघू या जरा.* किंवा आपल्या घरातील शाळेत जाणार्या मुलांपासून वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत सर्वांनाच विचारून बघू या जरा. उत्तर काय येते? हा प्रयोग मी करून बघितला आहे. भगतसिंग यांचा तथाकथित 'जबरा फॅन' असणार्या मला, २०१४ पर्यंत म्हणजे वयाच्या पस्तिशीपर्यंत, त्यांच्याविषयी काय माहित होतं? १. सॉंडर्स नावाच्या ब्रिटिश पोलीस अधिकार्यावर गोळ्या चालवणारा भगत सिंग. २. अन्यायी बिलांच्या विरोधात ब्रिटीशांच्या असेम्ब्लीमध्ये बॉम्ब फोडणारा भगत सिंग. ३. देशासाठी हसत हसत फासावर जाणारा भगत सिंग. बस्स… पण खरा भगतसिंग कोण आहे? तो विचार कसा करायचा? तो एक व्यक्ती म्हणून कसा होता, मुलगा म्हणून कसा होता, मित्र म्हणून कसा होता? वयाच्या तेविसाव्या वर्षी देशासाठी परमोच्च बलिदान देण्याची त्याची मानसिकता नेमकी काय होती?  या प्रश्नांनी मनात घर केलं आणि मी ठरविलं, *'भगतसिंगांविषयी' वाचायचं बस्स.. आता 'भगतसिंगांना' वाचायचं..!*

भगतसिंगांविषयी दोन प्रकारची पुस्तके असतात बाजारामध्ये. एक असते त्यांचे जीवन-चरित्र. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये त्यांचे विचार सांगणारी पुस्तके असतात. त्यातही ‘मी नास्तिक का आहे?’  सारखी छोटी पुस्तके खूप जणांना परिचयाची आहेत. परंतु सर्व भारताला प्रिय असणाऱ्या भगतसिंगांना जाणून घेण्यासाठी ही पुस्तके पुरेशी नाहीत. *भगतसिंगांना जाणून घ्यायचे असतील तर त्यांचे सर्व लेखन, सर्व विचार जाणून घ्यावे लागतात. ते ही त्यांच्या स्वत:च्या शब्दांमध्ये. थोडक्यात काय, तर भगतसिंग बोलत आहेत आणि आपण ते ऐकत आहोत, समजून घेत आहोत, ते ही कोणत्याही मध्यस्थाशिवाय... तेंव्हाच आपल्याला भगतसिंग म्हणजे नक्की काय रसायन होतं याचं पूर्ण आकलन होतं.* भगतसिंगांचे आयुष्य २३ वर्षे ५ महिने आणि २३ दिवसांचे. त्यातील राजकीय जीवनकाल फक्त आठ वर्षांचा. *जरा विचार करा मित्रांनो. स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले किंवा मृत्युदंड पत्करलेल्या, शहीद झालेल्या कित्येक क्रांतिकारकांमध्ये 'शहीद-ए-आझम ' हा मान फक्त भगतसिंग यांनाच का मिळतो?* याला कारणीभूत आहेत त्यांचे विचार, त्यांची मूल्ये ज्यांच्यासाठी ते जगले आणि शहीद झाले. या आठ वर्षांमध्ये त्यांनी कर्तुत्वाची परमोच्च सीमा गाठली. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षीच त्यांनी स्तंभलेखन सुरु केलं होतं. त्यांच्या लेखावरून त्यांच्या बुद्धिप्रामाण्याची आणि तर्कवादी विचारांची खात्री पटते.

भगतसिंग यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जितकं काही लिखाण केलंय, त्या सर्व लेखांचे एकत्रीकरण म्हणजे हे पुस्तक आहे. भगतसिंगांनी वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लिहिले, साथीदारांना आणि कुटुंबियांना पत्रे लिहिली, जेलमध्ये डायरी लिहिली ज्यात त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधील टीपा काढल्या आणि स्वत:चे विचारदेखील लिहिले. भगतसिंग यांचे आजघडीला उपलब्ध असणारे समग्र दस्त-ऐवज एकत्र करून प्रा. चमनलाल यांनी मूळ इंग्लिश भाषेत त्याचे संकलन केले आहे. त्याच्या मराठी अनुवादाचे संपादन केले आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि चळवळीमधील व्यक्तिमत्व दत्ता देसाई यांनी.

या पुस्तकाविषयी ‘मला काय वाटलं?’ हे मी इथे आता नाही बोलणार.. त्यापेक्षा मला भावलेले भगतसिंगांचे विचार मी त्यांच्याच भाषेमध्ये इथे विषयवार मांडतोय.

१) *युवकांसाठी संदेश*-

‘युवावस्था मानवी जीवनाचा वसंत काळ आहे. मदांध हत्तीप्रमाणे निरंकुश, वर्षाऋतूमधील रोंरावत्या नदीप्रमाणे अनावर, नवेल्या वसंताच्या पहिल्या फुलराणीच्या कळीप्रमाणे कोमल आणि ज्वालामुखीप्रमाणे उद्रेकी. जशी रणोत्सुक योद्ध्याच्या हातामध्ये खड्ग, तशी मनुष्याच्या देहामध्ये युवावस्था. म्हणूनच या युववास्थेमध्ये माणसासाठी दोनच मार्ग असतात- तो चढू शकतो उन्नतीच्या सर्वोच्च शिखरावर किंवा तो पडू शकतो अध:पाताच्या खोल अंधाऱ्या खाईमध्ये. वाटलं तर तो त्यागी होऊ शकतो नाही तर विलासी. जगाचा इतिहास युवकांनीच घडविला आहे. युवक महाभारताच्या भीष्मपर्वातील पहिल्या ललकारीप्रमाणे विक्राळ आहे, रावणाच्या अहंकारासारखा निर्भीड आहे. प्रल्हादाच्या सत्याग्रहासारखा अढळ आहे. जगाच्या क्रांत्यांची पाने तपासून बघा,तिथे केवळ असे युवक भेटतील ज्यांना बुद्धिमान लोकांनी ‘वेडी पोरं’ किंवा ‘वाट चुकलेले जीव’ अशी विशेषणे चिकटविली आहेत. मग हे भारतीय तरुणा, तू का असा गोंधळाच्या झोपेत घोरत पडला आहेस? तुझी आई स्फुंदून स्फुंदून रडते आहे. तिची असहायता तुला अस्वस्थ करत नाही का? धिक्कार असो तुझ्या कोडगेपणाचा! उठ. डोळे उघड. आणि झोपायचे असेल तर अनंत निद्रेच्या कुशीत जाऊन झोप.

२) *आमुलाग्र समाजक्रांतीचा विचार*-

- सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू हे कॉंग्रेसमध्ये (राष्ट्रीय सभा) असणारे आणि आज घडीला युवकांचे सर्वात जास्त प्रिय नेते आहेत. त्यांच्या विचारांची आपण तुलना करू. सुभाष बोस हे एक हळवे राष्ट्रवादी आहेत. त्यांच्या विचारांमध्ये भावुकता आहे. आपल्या प्राचीन युगाबद्दल आत्मीयता आहे. त्यांचे विचार हे सत्तापरिवर्तनवाद्याचे आहेत. तर नेहरूंचे विचार हे परिवर्तनवाद्याचे आहेत. एकाच्या मते आमच्या जुन्यापुराण्या गोष्टी खूप चांगल्या आहेत तर दुसऱ्याच्या दृष्टीने त्यांच्या विरोधात बंड केले पाहिजे. सुभाष बाबूंना कामगारांविषयी सहानुभूती वाटते आणि ते त्यांची परिस्थिती बदलू इच्छितात तर पंडितजी संपूर्ण व्यवस्थाच बदलू इच्छितात.

- लाल लजपतराय हे बडे प्रस्थ आहेत. ते रेल्वेच्या पहिल्या किंवा दुसर्या वर्गाने प्रवास करतात. त्यांना काय कळणार तिसर्या वर्गाच्या डब्यात किती लाथा खाव्या लागतात? लालाजी म्हणतात आमच्या साम्यवादी प्रचारामुळे भांडवलदार इंग्रज सरकारला जाऊन मिळतील. अरे वा! मग ते आधी कुठे होते?

- *आक्रमण करण्याच्या हेतूने जेंव्हा बळाचा वापर केला जातो तेंव्हा त्याला हिंसा म्हणतात* आणि तिचे समर्थन करता येत नाही. परंतु उचित आदर्शांसाठी जेंव्हा बळ वापरले जाते, ते नैतिकदृष्ट्या योग्यही असते. गुरु गोविंदसिंह, शिवाजी महाराज, केमाल पाशा आणि लेनिन यांच्यापासून आम्ही स्फूर्ती घेतली आहे.

- *क्रांती म्हणजे काय?* क्रांती म्हणजे अन्यायावर आधारित प्रचलित समाजव्यवस्थेमध्ये आमुलाग्र परिवर्तन. *राष्ट्राचे राष्ट्राकडून होणारे शोषण किंवा माणसाचे माणसाकडून होणारे शोषण या व्यवस्थेमध्ये परिवर्तन करून सर्वहारा वर्गाची सर्वमान्य सत्ता आणणे म्हणजे क्रांती.* क्रांतीमध्ये रक्तरंजित युद्ध अनिवार्य नाही. यामध्ये व्यक्तिगत प्रतिहिंसेला स्थान नाही. *क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब आणि बंदुका यांचा पंथ नव्हे. बॉम्ब आणि पिस्तुल क्रांतीसाठी साधन बनू शकतात. परंतु खरी क्रांती हि विचारांनी होते. विद्रोहाला क्रांती म्हणता येणार नाही.* परंतु विद्रोहाची परिणती क्रांतीमध्ये होऊ शकते. लोक सर्वसाधारणपणे परंपरागत स्थितीला बिलगून असतात व बदलाच्या केवळ विचारानेच ते घाबरतात. जुनाट व्यवस्था सदैव टिकून राहू नये व नव्या व्यवस्थेसाठी जागा रिकामी करत राहणे आवश्यकच आहे. *‘इन्कलाब झिंदाबाद’* हि घोषणा देताना आम्हांला हा अर्थ अभिप्रेत असतो.

- तुम्ही जेंव्हा गरीब शेतकरी किंवा कामगारांकडे क्रांतीमध्ये सामील होण्यासाठी विचारणा कराल, ते तुम्हांला परखडपणे विचारतील कि या क्रांतीमधून त्यांना काय मिळणार आहे? _सरकारच्या शीर्षस्थानी लॉर्ड रीकिंग असो किंवा पुरुषोत्तमदास ठाकरदास, जनतेला काय फरक पडणार आहे?_  तुम्ही तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांना ‘वापरून’ घेऊ शकणार नाही. क्रांती हि त्यांच्या भल्यासाठी आहे हे तुम्ही त्यांना समजावून सांगायला हवे.

- *कोणताही क्रांतिकारक इतर कशाहीपेक्षा तर्कशुद्ध विचारांवर सर्वात जास्त भरवसा ठेवतो. तो फक्त विवेक आणि विवेकबुद्धीसमोरच झुकतो.* त्याला लोकांचा पाठींबा मिळाला नाही किंवा त्याच्या कार्याची प्रशंसा झाली नाही तर तो आपले ध्येय सोडून देईल हा निव्वळ मूर्खपणा आहे. गांधीजींनी आयुष्यभर जनजीवनाचा अनुभव घेतला आहे. परंतु ते क्रांतिकारकांची मानसिकता समजू शकले नाहीत. क्रांतिकारक आपले शीर तळहातावर घेऊन फिरत असतात. लोक त्यांचा जयजयकार करतात म्हणून ते हा त्याग करत नसतात तर त्यांची सद्सद्विवेकबुद्धी त्यांना असे करायला सांगत असते म्हणून ते या मार्गाचा अंगीकार करतात.

३) *धर्म, जात आणि राजकारण*-

( *_तुरुंगामध्ये भंगी काम करणाऱ्या व्यक्तीला भगत सिंग ‘बेबे’ म्हणजे आई म्हणून हाक मारत असत आणि त्यांच्यापोटी अपार स्नेहभाव राखत असत. फाशीवेदीवर स्वतःचे शीर समर्पित करण्यापुर्वी या ‘बेबे’च्या हातूनच त्यांनी रोटी खाल्ली होती._* )

- आपला देश खूपच अध्यात्मवादी आहे. पण माणसाला माणसाचा दर्जा द्यायला कां-कू करतो. दुसरीकडे पूर्णतः भौतिकवादी असणारा युरोप शतकांपासून ‘इन्कलाब’चा नारा बुलंद करत आला आहे. आपण मात्र आत्मा-परमात्मा यांच्यावर चर्चा करतोय, अस्पृश्यांना जानवं घालायला द्यायचं कि नाही यावर वादविवाद करतोय. एक कुत्रा आपल्या मांडीवर बसतो, स्वयंपाकघरात बिनदिक्कत फिरतो. पण एका माणसाचा स्पर्श झाला म्हणून आपला धर्म भ्रष्ट होतो. आज मदनमोहन मालवीय यांच्यासारखे समाजसुधारक भंग्याच्या हस्ते गळ्यात हार घालून घेतात आणि नंतर मात्र अंगावरच्या कपड्यांसाहित स्नान केल्याशिवाय स्वत:ला पवित्र समजत नाहीत. काय हि चलाखी? आज अस्पृश्यांना आपल्या गोटात( धर्मात) ओढण्यासाठी चढाओढ लागली असताना जर त्यांना “आपण स्वत:च का संघटीत होऊ नये?” असं वाटलं तर त्यात गैर काय? ‘ते लोक घाण काम करतात म्हणून आम्हांला त्यांचा स्पर्श नको असतो’ अशी कारणे आता चालणार नाहीत. आईसुद्धा आपल्या मुलाची शी साफ करते. म्हणून काय ती थोडीच भंगी किंवा अस्पृश्य होते?

- अस्पृश्य जाती जोवर स्वत:ला संघटीत करणार नाहीत, हे होणार नाही. आमचे असे म्हणणे आहे कि त्यांनी स्वत:साठी जास्त अधिकार मागावेत, स्वत:चे लोकप्रतिनिधी निवडावेत.. अस्पृश्य म्हटल्या जाणार्या बंधुंनो, उठा! आपल्या इतिहासाकडे बघा. गुरु गोविंदसिंहांच्या फौजेची खरी शक्ती तुम्ही होता. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या जोरावर लढले. तुम्ही सदैव सेवा आणि प्रसंगाने बलिदाने देऊन जे काही केलं आहे त्याची जाणीव आम्हां लोकांना नाही आहे.

- गरीब कष्टकरी, शेतकरी यांना हे समजावून सांगितले पाहिजे कि तुमचे खरे शत्रू हे भांडवलदार आहेत. त्यांच्या ताब्यात सापडू नका. जगातील सर्व गरिबांना समान अधिकार आहेत. मग तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, जातीचे असा, वर्गाचे असा. तुम्ही हे सर्व भेदभाव टाळून एकत्र राहा आणि सत्ता हातात घ्यायचा प्रयत्न करा, यातच तुमचे हित आहे.

- देवावर विश्वास ठेवणारा एखादा हिंदू मरताना पुढचा जन्म राजाचा मिळण्याची अपेक्षा ठेवत असेल, एखादा मुसलमान/ख्रिस्ती हालअपेष्टा यासाठी सोसत असेल कि मृत्युनंतर त्याला स्वर्गीय सुखांची प्राप्ती होईल. पण आज मी कोणती अपेक्षा ठेवावी? मला माहित आहे कि फाशीचा दोर माझ्या गळ्याभोवती आवळला जाताच माझा अंत होईल. अशा वेळी कोणतेही भव्यदिव्य यश नसलेले थोड्या दिवसांचे हे संघर्षपूर्ण जीवन हेच माझे बक्षीस आहे. ‘श्रद्धा’ माणसाच्या हालअपेष्टांची तीव्रता कमी करते. सध्याच्या परिस्थितीत देवावर विश्वास ठेवला असता तर माझ्या मनावरचा भार कदाचित कमी झालाही असता. परंतु प्राक्तनाला सामोरे जाताना मला अशा कोणत्याही मादक कैफाची आवश्यकता वाटत नाही. मी वास्तववादी आहे. विवेकाच्या जोरावर मी माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीवर मात करायचा प्रयत्न करेन. हे करताना मला यश मिळेलच असे नाही, पण प्रयत्न करणे हे माणसाचे कर्तव्य आहे.

- केवळ श्रद्धा किंवा अंधश्रद्धा धोकादायक आहे. ती मेंदू शिथिल करते आणि माणसाला प्रतिगामी बनविते. जो मनुष्य स्वत:ला वास्तववादी समजतो, त्याने संपूर्ण सनातन धर्मश्रद्धेला आव्हान दिले पाहिजे.प्रगती घडवायला निघालेल्या व्यक्तीला जुन्या श्रद्धेतील प्रत्येक बाबीवर टीका करावी लागते, अविश्वास दाखवावा लागतो, तिची चिकित्सा करावी लागते.

- तुमच्या सिद्धांतानुसार हे जग परमेश्वराने घडविले असेल त्याने या जगात इतके दु:ख का दिले? कृपा करून हा त्याचा कायदा आहे असे म्हणू नका.आणि जर तो नियमांनी बांधला असेल तर तो सर्वशक्तिमान कसा? कृपा करून हि त्याची आनंदक्रिडा आहे असेही म्हणू नका. मग त्याच्यात आणि रोम जळताना वाद्य वाजवित बसलेल्या निरोमध्ये किंवा स्वत:च्या सुखासाठी कित्येकांचे प्राण घेणाऱ्या चेंगीज खान यांच्यामध्ये काय फरक आहे? यातना देऊन नंतर सुख देणाऱ्या त्या परमेश्वरामध्ये आणि हिंस्त्र पशुंपुढे जनावरे फेकून नंतर त्यांच्यापैकी जिवंत वाचलेल्या जीवांची सुश्रुषा करणाऱ्या नराधम लोकांमध्ये फरक तो काय?

~~~~~~~~~~~~~~~~~~

मित्रांनो, इच्छा तर खूप आहे की अख्खं पुस्तकच इथे उतरून काढावं. पण ते शक्य नाही आणि योग्यसुद्धा नाही. परंतु वर दिलेल्या उतार्यांमधून कोणते भगत सिंग भेटतात आपल्याला?

- पूर्णतः समाजवादी विचारसरणी असणारा भगतसिंग.

- लाला लजपत राय यांना मानणारा, परंतु त्यांची आंधळी भक्ती न करणारा भगतसिंग.

- नेहरू आणि सुभाष चंद्र बोस यांच्या कार्य आणि विचारसरणीमधील नेमका फरक ओळखणारा भगतसिंग.

- गांधीजींशी मतभेद असणारा परंतु मनभेद नसणारा भगतसिंग.

- केवळ ब्रिटिशांना विरोध करणारा नव्हे, तर दमन किंवा शोषण करणारा व्यक्ती भारतीय असेल तर त्याचे सुद्धा निर्दालन करू पाहणारा भगतसिंग.

- केवळ धर्म किंवा जाती नव्हे, तर प्रत्यक्ष परमेश्वरालादेखील नाकारणारा भगतसिंग.

- क्रांती, हिंसा/अहिंसा या संकल्पना कोळून प्यालेला भगतसिंग.

- केवळ स्वातंत्र्यासाठी नाही, तर आमूलाग्र समाजक्रांतीसाठी तळमळणारा, झटणारा भगतसिंग.

- बुद्धिप्रामाण्यवाद, मानवता, बंधुता यांच्यावर कठोर निष्ठा ठेवणारा भगतसिंग.

- परंपरेच्या नावावर बाजार घातलेल्या अंधश्रद्धा, पोथीनिष्ठा आणि मानसिकता नाकारणारा भगतसिंग.


असे कितीतरी भगतसिंग आपल्याला भेटत राहतात या पुस्तकाच्या पानांमध्ये. त्यांना भेटताना, त्यांचेशी बोलताना, त्यांचे विचार समजुन घेताना आपले विचार आपोआप तयार व्हायला लागतात. परंतु केवळ एकदा वाचून हे होत नाही. त्यासाठी वारंवार यावं लागतं या पुस्तकाकडे, या सगळ्या भगतसिंगांना भेटण्यासाठी. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, प्रत्येक वेळी, प्रत्येक वाचनात एक नवीन भगतसिंग भेटत राहतो आपल्याला.

माझ्यासाठी पुढचा टप्पा असेल तो म्हणजे भगतसिंग यांचे चरित्र आणि त्यांचे समग्र वाङ्मय यांना एकसाथ वाचायचं. मला जाणून घ्यायचं आहे की, वयाच्या अमुक एका टप्प्यावर भगतसिंग यांनी अमुक असे विचार मांडताना, त्यांच्या शरीराची, मनाची, मित्रांची, HSRA या संघटनेची, आजूबाजूच्या समाजाची आणि भारताची, परिस्थिती नेमकी नक्की काय होती जेणेकरून त्यांनी असे विचार मांडले? त्याचप्रमाणे समजा भगतसिंग जर आज असते तर त्यांनी रशियातील साम्यवादी विचारसरणीच्या अपयशावर कोणती भूमिका घेतली असती किंवा जागतिकीकरणामुळे फोफावलेल्या 'GDP आणि शेअर मार्केट यांच्यावर आधारलेल्या' अर्थव्यवस्था आणि त्यांनी वाढलेली समाजघटकांमधील विषमता, टोकाचा राष्ट्रवाद, सांप्रदायिक विचारांतून धोक्यात आलेली एकता अशा ज्वलंत मुद्द्यांवर ते काय कडाडले असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय 'समग्र भगतसिंग वाचन' अपुरंच राहील. परंतु या प्रश्नांच्या समाधानासाठी केवळ वाचन करून नाही भागणार.. तर्कशास्त्र, मानसशास्त्र यांचा शक्य तितका वापर करून मूल्यमापनवादी अभ्यास करावा लागेल. आणि यासाठी लागणारा वेळ मी सध्याच्या काळात नाही काढू शकत. पण आज नाही जमलं तर उद्या, उद्या नाही तर परवा..

होणार हे नक्की..


कारण, 

*भगतसिंग मनामनांत रुजविणे ही या समाजाची, देशाची आणि पूर्ण माणुसकीची गरज आहे !*



- *डॉ. मदन भिमसेन जाधव, सांगली.*

Comments

Popular posts from this blog

Hall Ticket Exam, 2024

यूजीसीचे पहिले अध्यक्ष मा. सी.डी.देशमुख