शिराज्याभिषेक ०६/०६/२०२२
६ जून १६७४ हा दिवस म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहुन ठेवावा असाच दिवस अर्थात शिवराज्याभिषेक दिन. मराठयांच्या या सार्वभौमत्वाच्या सोहळ्याचे यथार्थ असे वर्णन सभासदकाराने आपल्या बखरीत केलेले आहे, सभासद बखरीमध्ये आलेले शिवराज्याभिषेकाचे वर्णन, सभासदकार म्हणतात -
" तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव रायगड म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३ स मुहूर्त पाहिला. ते दिवशी राजियानी मंगलस्नाने करून श्रीमहादेव व श्रीभवानी कुलस्वामी व उपाध्ये प्रभाकर भटांचे पुत्र बाळभट कुलगुरू व भट गोसावी वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरूष अनुष्ठित यांची सर्वांची पूजा यथाविधी अलंकार वस्त्रे देऊन केली. सर्वास नमन करून अभिषेकास सुवर्ण चौकीवर बसले.
अष्टप्रधान व थोर ब्राह्मणांनी स्थळास्थळाची उदके करून सुवर्णकलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन सर्व पूज्य मंडळास नमस्कार करून सिंहासनावर बसले. सिंहासनास अष्ट खांब जडित केले. त्या स्थानी अष्टप्रधानांनी उभे राहावे. पूर्वी कृतायुगी, त्रेतायुगी, द्वापारी, सिंहासनी बैसले. त्यापद्धती प्रमाणे शास्त्रोक्त सर्वही साहित्य निराळे केले. अष्टखांबी अष्टप्रधान उभे राहिले. छत्र जडावाचे मोती व झालरीचे करून मस्तकावर धरिले. छत्रपति असे नाव चालविले. क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपती सिंहासनावर बसले. त्या दिवसापासून राज्याभिषेकशक नियम चालविला. येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले.. "
या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाली नाही...🚩🚩
दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारा मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचा, स्वातंत्र्याचा दिवस शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐💐
Comments
Post a Comment