रमाबाई रानडे जयंती

 भारतीय समाजसुधारणा चळवळीच्या अध्वर्यू  रमाबाई रानडे यांची आज  २५ जानेवारी जयंती  !!


भारतीय प्रागतिक चळवळीचे धुरीण,थोर भारतीय अर्थशास्त्रज्ञ न्यायमूर्ती महादेव  ( माधवराव)गोविंद  रानडे यांच्या त्या सुविद्य पत्नी.त्यांचे नाते मोठे अद्भुत होते. समाजाच्या विरोधाला झुगारून न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले. न्यायमूर्ती रानडे यांचं १६ जानेवारी १९०१ रोजी निधन झालं. ते गेल्यानंतर रमाबाईंच खरं कार्य सुरु झालं. महर्षी धोंडो केशव कर्वे लोकांचा रोष पत्करून विधवांना शिक्षण देत होते. या कार्याला आपला हातभार लागावा म्हणून १२ जुलै १९०४ पासून अनाथ बालिकाश्रमाच्या व्यवस्थापनाचं अध्यक्षपद रमाबाईंनी स्वीकारलं.

अल्पवयीन मुलींचं देवधर्माच्या नावाखाली केलं जाणारं लैंगिक शोषण थांबवावं, यासाठी भांडारकरांनी गव्हर्नरला जे पत्र लिहिलं त्यात काशीबाई कानिटकर आणि रमाबाई रानडे या अग्रक्रमी होत्या. याच काळात देशात स्त्रियांना मताचा अधिकार द्या, अशी चळवळ सुरू झाली होती रमाबाई रानडे यांनी ‘सर्व्हट्स ऑफ इंडिया’ या साप्ताहिकात पत्र लिहून चळवळीचा मुंबई कायदे कौन्सिलात मताधिकार मिळवण्यासाठी मार्च ते जुलै १९११ असा पाच महिने जोरदार लढा दिला. अधिवेशनात ठराव मांडताना रमाबाईंनी इंग्रजीतून केलेली भाषणं वाचनीय आहेत. त्यांचं हे कार्य लक्षात घेण्यासारखं आहे

रमाबाई स्त्री शिक्षण, न्याय्य हक्क, समान अधिकार आणि समाज सुधारणेसाठी अविरत झटल्या. त्यांनी स्त्रियांना प्रशिक्षित रुग्णसेवा ही केवळ एक सेवा नव्हे तर उपजिवीकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितले. त्या काळी रुग्णसेवा ही व्यावसायिकदृष्ट्या समाजात रूढ नव्हती आणि स्त्रियांसाठी तर ही दारे नेहमीच बंद होती. रुग्णसेवेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सेवा सदन मधूनच पहिली भारतीय नर्स समाजात वावरू लागली. समाजाच्या रूढींना झुगारून स्त्रीस्वावलंबनासाठी रुग्णसेवेची दारे उघडून अनेक गरजू महिलांना नवा मार्ग दाखवला. तरूण मुली आणि विधवांसाठी सेवा सदन एक मोठा आधार होता. पुण्यातील आपल्या वडिलोपार्जित वाड्यातून सुरू केलेले सेवा सदन हे उत्तरोत्तर वाढतच गेले. रमाबाई रानडे  ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली.  रमाबाईंनी १९१६ मध्ये ‘सबअसिस्टंट सर्जन’ हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थिनी मॅट्रिक पास व शास्त्रीय विषयाची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे, ही अट होती. आजही नर्सिग कोर्ससाठी वेगळी सीईटी घेतली जाते. शंभर वर्षांपूर्वी ही सुरुवात रमाबाईंनी केली. केवढी दूरदृष्टी! शंभर वर्षांपूर्वी मुलींना शाळेतही जाण्यासाठी संघर्ष करावा लागायचा तिथे पुढचं शिक्षण घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं केवढं धाडसाचं काम पण रमाबाईंनी ते शंभर वर्षांपूर्वी केलं. अनेकींचं आयुष्य मार्गी लागलं..!या कोर्ससाठी सात जणी दाखल झाल्या. त्यात मराठा, ब्राह्मण, ख्रिश्चन, मुस्लीम मुली होत्या. त्या सर्व एकत्रच राहात असत. १४ ऑक्टोबर १९१७ रोजी ‘सेवासदन’ संस्थेची स्वतंत्र नोंदणी झाली. पुण्यात फ्लूची साथ आली तेव्हा ‘सेवासदन’ने परिचारिका पुरवल्या.

रमाबाईंच्या ‘सेवासदन’ संस्थेचा व्याप वाढत राहिला. पुण्यात पाच व संस्थेच्या अन्य शाखांमध्ये सात अशी बारा वसतिगृहं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी झाली. १२० गरीब विद्यार्थिनींचा सर्व खर्च ‘सेवासदन’ करीत असे. रमाबाई संस्थेत धर्म, जात, पंथ, प्रांत असा कोणताही भेदाभेद करीत नसत. त्यामुळे सर्व जाती-धर्माच्या मुली इथे शिकायला येत. न्या. रानडे यांच्याबरोबर रमाबाई प्रार्थना समाजाच्या उपासनेला जात. तिथेही ‘भेदाभेद अमंगळ’ असा उपदेश केला जात असे.

आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत.

येरवडा तुरुंगाच्या रमाबाई मानद पर्यवेक्षक होत्या. तिथेही त्यांनी तुरुंगातील स्त्रियांना साक्षर करणं, त्यांना समुपदेशन देणं ही कामगिरी वीस वर्ष केली . कुठेही सामाजिक असमानता दिसली की त्या तिथे जाऊन काम करीत.

१९१८ मध्ये मुंबई कायदा कौन्सिल ने ५ते ११ वयोगटातील मुलांसाठी सक्तीचे आणि मोफत शिक्षण हा कायदा संमत केला पण यात मुलींच्या मोफत शिक्षणाचा मात्र उल्लेखच नव्हता. हे मोफत शिक्षण मुलामुलींना एकदमच लागू करावे यासाठी १५ दिवसात ५० सभा झाल्या पुण्यात कर्वे संस्था ,सेवासदन यांनी भाग घेतला.याचे नेतृत्व रमाबाईंनी केले .

ही बातमी जवाहरलाल नेहरू यांची आई स्वरुपराणी नेहरू यांच्या पर्यंत पोहोचली. त्यांनीही अलाहाबादच्या सभेत हा मुद्दा उचलून धरला शेवटी असा भेद करणार नाही असा निर्णय पुणे म्युनिसिपालिटीला घ्यायला लागला .

१९१३ साली गुजरात आणि काठेवाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळपीडितांना मदत केली.

पुण्यातील हुजूरपागा शाळेच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

त्यांनी आपला जीवनपट 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे

मार्च १९२२ पासून रमाबाईंना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. पुन्हा दोन वर्षांनी १९२४ मध्ये रमाबाईंना कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या आजारातच २६ एप्रिल १९२४ रोजी दुपारी त्या अज्ञाताच्या प्रवासाला गेल्या. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या वर स्त्री-पुरुष होते. स्त्रिया स्मशानात जात नाहीत तरीही अनेक स्त्रिया अंत्ययात्रेला होत्या. स्मशानात रँगलर परांजपे व बनुताई भट यांची भाषणं झाली. त्यांच्या भावाने त्यांना अग्नी दिला. इच्छापत्र करताना रमाबाईंनी आपली स्वत:ची मिळकत ‘सेवासदना’ला दिली.

उंच माझा झोका हि त्यांचा जीवनावरील आधारित दूरचित्रवाणी मालिका खूप गाजली होती.


( माहिती संकलन संदर्भ :

१. १०० वर्षांपूर्वीची ज्ञानमार्गी - मधुवंती सप्रे ( लोकसत्ता )

२. आमच्या आयुष्यातील काही आठवणी – रमाबाई रानडे

३. रमाबाई महादेवराव रानडे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व –  ले. विलास खोले

--------------------------

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)