महात्मा बसवेश्वर

 महात्मा बसवेश्व्र --- विद्रोहाची विधायक पेरणी करणारा प्रज्ञावंत 

महात्मा बसवेश्वर...मध्ययुगीन कालखंडावर आपल्या विद्रोही बाण्याची अवीट छाप सोडणारा प्रज्ञावंत मनुष्य्.मध्ययुगाचा इतिहास बसवक्रांती शिवाय अपूर्णच असेल.बसवण्णा या नावानेच आपण महात्मा बसवेश्वर यांना साद घालतो.बसवण्णा विजापूर जिल्ल्हयातील एका गावात जन्माला आले. लहानपणीच बसवण्णांनी वयाच्या आठव्या  वर्षी आपली मुंज करुन घ्यायला नकार दिला आणि हे बाळं नेहमीच्या पठडीतले नाही याची जाणीव आईवडीलांसह इतरांना झाली.सलग बारा वर्षे त्यांनी कुडलसंगम या ठिकाणी वास्तव्य करुन वेगवेगळया भाषा,धर्म व तत्वज्ञान यांचा अभ्यास केला.त्यांच्या जीवनाची जवळजवळ एकतीस वर्षे सोलापुरातील मंगळवेढा या ठिकाणी गेलीत. ही बसवण्णांची कर्मभुमीच होती.बसवण्णानी ‘ शरण चळवळ ‘उभी करून विद्रोहाचा उठाव केला.समाजाच्या प्रत्येक थरातून सर्व जाती धर्माचे लोक शरण चळवळीत उभे राहिले." कायकवे कैलास " अर्थात श्रम हाच ईश्वर  ही घोषणाच करुन टाकली.क्रांतीचे केंद्र म्हणून बसवण्णंनी ‘ अनुभवमंटप ‘ उभारला.याच अनुभवमंटपात स्त्री पुरुष , गरीब श्रीमंत ,जाती व धर्म  आणि उच्च नीच ह्या भिंती गळून पडल्या.आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे बसवण्णा त्यावेळच्या सनातनी वर्गाच्या डोळयात खुपू लागले.संधी साधून सनातन्यांनी बसवण्णा विरोधात खेळी रचली आणि शरण शरणार्थीवर राजा बिज्ज्लदेव मार्फत हल्ला चढवून ‘ अनुभवमंटप ‘ उधळून लावला. अनेक शरण शरणार्थी ठिकठिकाणी विखुरले. एक क्रांती मशाल विझवण्यात सनातनी वर्गाला यश आले.

  बसवण्णा हे लिंगायत धर्म संस्थापक आहेत. हा धर्म सनातनी वैदीक धर्माच्या विरोधातील एक क्रांतिकारी असे बंड होते, पाऊल होते. बसवण्णा ज्या मध्ययुगात कार्यरत होते त्या युगात सनातनी वैदीक धर्माने कर्मकांडाच्या उभारलेलल्या अंधश्रध्द् भिंती पाहून बसवण्णा विद्रोही बनले.बंडाचे निशाण उभारुन त्यांनी अंधश्रध्दांवर आसूड उगारला. ज्या श्रमाला हा सनातनी वर्ग तुच्छ् लेखत होता त्या श्रमालाच बसवण्णांनी श्रेष्ठ् ठरवत विधायक धर्माचा पायाच रचला.अज्ञानाकडून ज्ञानाकडे,मंदीराकडून अनूभवमंटपाकडे,बहूदेवतावादाकडून एकेश्वरी देवतावादाकडे,ग्रंथप्रामाण्याकडून बुध्दीप्राण्यावादाकडे आणि अंधश्रध्देकडून विवेकवादाकडे घेऊन जाणारी ‘ शरण चळवळ ‘ बसवण्णांनी उभी केली.सहज साधी शिकवण आणि सहज साधे जीवन जगण्याची रीत त्यांनी घालून दिली.स्त्रीयांना समान अधिकार,दलीतांना समान संधी,जातीभेद व वर्णभेद यांची हकालपट्टी,पुरोहितगिरीला मज्जाव,पर्यावरणाची जपणूक आणि पशूपक्ष्यांना नवजीवदान ,शुभ व अशुभाला तिलांजली,कर्मकांडापासून सुटका करणारी जीवनप्रणाली आणि अंधश्रध्दामुक्त् जीवनाचे आचरण अशा काही जीवनोपयोगी आणि शोषणाविरहीत तत्वज्ञानाची निर्मिती करून बसवण्ण्णांनी नवधर्माचा पाया रचला. त्यांच्या या विद्रोही कार्याला साहजीकच विरोध झाला. पण बसवण्णानी न डगमगता एका नव्या ‘ जीवनधर्माचा पर्याय ‘ लोकांसमोर ठेवला. चातुर्वण्यावर हल्ला चढवताना त्यांनी जातीअंतर्गत श्रेष्ठत्वाचे दावे मोडून काढले, कर्मकांडाला उध्दवस्त् करताना बसवण्णांनी पुरोहितशाहीचा पायाच उखडुन पडेल असे सोपे तत्वज्ञान रचले,धर्मग्रंथांना आव्हान म्हणून बसववचन उभे केले,श्रेष्ठत्वाचे गंड संपवताना श्रमप्रतिष्ठा रुजवली. असा मनुष्य  तत्कालीन सनातनी वर्गाच्या डोळयात न खुपला तरच नवल होते.

 बसवण्णांचे एकुणच कार्य खूपच क्रांतिकारी पध्दतीचे आहे. आजच्या संदर्भात बसवण्णा नेमके कशासाठी प्रस्तुत आहेत  आणि आज त्यांचा कोणता कार्यक्रम अनुकरणात्म्क आहे याचा विचार करावाच लागेल. बसवण्णा जरी मध्ययुगातील बंडखोर विद्रोही असले तरीही,आजच्या काळातही बरेच बाबतीत ते मार्गदर्शक आहेत.बसवण्णांचे अनुभवमंटप म्हणजे जणू काही लोकशाहीतील संसदीय कार्याची मुहूर्तमेढ म्हणायला हरकत नसावी.जिथे सर्व प्रकारच्या शरण व शरणार्थींना वादसंवादाची स्पेस अर्थात जागा उपलब्ध्‍ होती.स्त्रीया अनुभवमंटपात बसून निरनिराळया विषयावर आपली मते मांडू शकत असत हे मध्ययुगाचा विचार करता किती मोठी कामगिरी होती याचा विचार करावा. अगदी आजही आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध पाहता,मध्ययुगात बसवण्णा एक चांभार व एक ब्राम्हण  यांचे आंतरजातीय लग्नाची उभारणी करतात हे पाऊल नक्कीच काळाच्या खूपच पुढे होते.बहुदेवता हाच जिथे ईश्वरीय पुजेचा गाभा होता तिथे बहुदेवतावादाला सोडचिठ्ठी देऊन एकेश्वरीवादाची नवी रचना ही थेट धर्माच्या रचनेतील ‘ विधायक ढवळाढवळ ‘ होती.हे करण्याचे साहस बसवण्णाच करु जाणे.तत्वज्ञानाच्या अनोख्या उभारणीतून स्त्रीयांना थेट नेतृत्वपदापर्यंत आणणे ही स्त्रीमुक्तीची एक नवी पहाटच होती.शरणवचनांना भारतभरातील प्रचाराची जोड देताना नवनवीन सच्चे अनूयायी मिळवणे ही काही साधी गोष्ट् नाही.मध्ययुगाचा विचार करता व अवतीभवतीचे राजकीय वळण पाहता आणि त्या राजकीय सत्तांचा परंपरागत धर्मशाहीला असणारा राजकीय व आर्थिक पाठिंबा पाहता नवधर्मासाठी आवश्यक  ती प्रसारयंत्रणा मिळवण्याचे कौशल्य नाकारुन चालणार नाही.बसवण्णानी उभारलेल्या प्रत्येक कार्याची अगदी आजही गरज आहेच हे निर्विवाद.

बसवण्णांचा एक महत्वाचा विचार ,ज्याकडे म्हणावे तितके लक्ष गेले असे दिसत नाही.बसवण्णांनी मानवी जीवनाला व विशेषत: भारतीय जनतेला दिलेला एक अनमोल असा हा विचार आहे.बरेच मार्गदर्शक अथवा नवविचार मांडणारी थोर मंडळी ही मानवी देहाला फारसे महत्त्व  देत नाहीत. मानवी देह म्हणजे मायालोभाचे आगार ते मलमुत्रांची गटारगंगा अशी वर्णने सहज वाचण्यात येतात.मानवी देह हा जणू काही ‘ अपवित्र असा फक्त  मांसाचा गोळा ‘ आहे अशा काही दुरस्थ् नजरेनेच तो तुम्हांआम्हांला दाखवला गेलाय. बसवण्णांनी मात्र मानवी देहाचे  पवित्रपण ‘ जपले. त्यांनी या मानवी देहाची भौतीकवादी रचना सांगून त्याला रसहीन बनवले नाही की त्याला अध्यात्मवादी भावनेने उगाचच गुढं दर्शवले नाही. त्यांनी दोन्ही बाजूमधून वेगळा मार्ग निवडला आणि त्यांनी मानवी देहालाच थेटपणे देवालयापेक्षा महत्वाचे मानले.संपूर्ण मानवी देहाची उभारणी मंदीराच्या उभारणीप्रमाणे दाखवण्याचे बसवण्णांचे कौशल्य वादातीत असेच आहे.बसवण्णा एका ठिकाणी जे नोंदवतात ते फारच महत्वाचे आहे. बसवण्णा म्हणतात की, “ देहच माझे देवालय,देवळाचे खांब माझे पाय,मस्तक  माझे सुवर्णकलश,स्थावर पावे नाश,जंगम हे अविनाश् “.याचा स्पष्ट् अर्थ असा की,माझा देहच माझे देवालय आहे,माझे पाय देवळाचे खांब आहेत,माझे मस्तक  हेच माझ्या मंदिराचे सुवर्णकलश आहेत आणि इतर स्थावर मालमत्ता लोप पावेल परंतु ही संपत्ती अविनाशी आहे.किती थोर विचार आहेत पहा.मानवी देहाला थेट मंदीराची उपमा देणरा पहिला थोर मनुष्य  आहे बसवण्णा,ज्या पायांना फारशी किंमत नव्हती त्यांना थेट मंदिराचे खांब बनवणे म्हणजे त्यांच्या थोरवीचे गीत गाणे आहे,मानवी मस्तकाला मंदिराचा सुवर्णकलश्‍ म्हणणे हा सर्वोच्च  असा पवित्र सन्मानच आहे आणि ही संपत्ती अविनाशी आहे अशी घोषणा करणे याचा स्पष्ट् अर्थ मानवी देहाची यथार्थता पटवून देणे आहे.आजवरच्या मानवी जीवनाच्या थोर विवेचकांना मानवी देहाची ही थोरवी दिसली नाही,हे कसे काय  ? याचे कारणच मुळी त्यांनी मानवी देहाकडे पाहण्याची आपली परंपरागत दृष्टी कायम ठेवूनच सारे विवेचन केले आहे.याउलट बसवण्णा मानवी देहाला समोर ठेवून त्याची थोरवी पटवतात तेव्हा ते मानवी समाजाचे खरे प्रतिनिधी म्हणून समोर येतात.बसवण्णांनी मानवी देहाच्या माध्यमातून मानवी समाजाचीच थोरवी सांगितली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.जो मनुष्य नाकारीक दृष्टीने मानवी शरीर पाहून त्याज्य् या कोटीत त्याला ठेवत होता ,त्या दृष्टीला बसवण्णांनी एका वेगळया आशयाचा ‘ नजरीया ‘ दिला. बसवण्णांचे हे मोठेपण मानवी समाजाने विसरु नयेत.बसवण्णांची प्रस्तुतता आणि अनुकरणात्म्कता खूपच बाबतीत असली तरीही ,मानवी देहाची बसवण्णांनी वाढवलेली उंची वेगळीच असून यामध्ये त्यांच्या एकुणच विचारांचे वेगळेपण सामावलेले आहे असे मला वाटते.

उमेशसूर्यवंशी 9922784065 

( " दृष्टिकोन " या आगामी पुस्तकातील लेख ..विचारार्थ पाठवतोय )

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.C.A. I. NEP 2.0