ती फुलराणी -- ज्योत्स्ना गाडगीळ
ती फुलराणी - लेखिका गाडगीळ
गजरा माळणं ही एक कला आहे, याची जाणीव मला रहाटे काकूंना बघितल्यावर झाली. अंबाड्यावर गोलाकार माळलेला मोगऱ्याचा, तगरीचा, जाईचा, जुईचा, बकुळीचा गजरा, नाहीतर एखादं फुल तरी खोवलेलं असतंच.
काकूंनी सत्तरी ओलांडली आहे. केसांचा आणि गजऱ्याचा रंगही जवळपास एकसारखा झाला आहे, मात्र त्यांचा फुलं माळण्याचा सोस अजून संपलेला नाही. कोणी त्यांना फुलवाल्या काकू म्हणतं, तर कोणी फुलाची कुंडी! काकूंनाही या टोपणनावांची सवय झालीये. पण कुठे राग नाही, की चिडचिड नाही.
'हॅप्पी गो लकी' कॅटेगरीत मोडणाऱ्या अशा रहाटे काकू! त्यांचा हसमुख चेहरा ताज्या फुलासारखा टवटवीत दिसतो. केसात माळलेलं फुल किंवा गजरा त्यांच्या सौंदर्याला 'चार चाँद' लावतो. ह्या वयातही त्या 'संतूर गर्ल' सारख्या सदासर्वदा फ्रेश दिसतात.
काकूंच्या रसिकतेबद्दल एकदा त्यांची सविस्तर मुलाखतच घ्यावी म्हटलं आणि एका रविवारी त्यांच्या घरी धडकले.
चारही बाजूंनी वेढलेल्या हिरवळीत त्यांचं बैठं घर लपलं होतं. बाहेर नावाच्या पाटीवरसुद्धा एक वेल लगडली होती. ती बाजूला केल्यावर रहाटे आडनाव दिसलं. घराच्या उंबरठ्यावर दोहोबाजूंना कलात्मकतेने फुलं ठेवली होती. प्रवेशद्वारावर देखील एक वेल घरंगळत आली होती.
गवताच्या पायपुसणीवर पाय स्वच्छ करून मी आत गेले. काका आणि काकू पोहे खात बसलेले. मी येताच त्या स्वागताला उभ्या राहिल्या आणि पोहे आणायला स्वयंपाकघरात गेल्या. काका पोहे खाण्यात मग्न होते.
सोफ्यावर बसून मी घरभर नजर फिरवली. प्रत्येक वस्तू रसिकतेने मांडली होती. समोरच्या टीपॉयवर मातीच्या एका पसरट भांड्यात मोगऱ्याची फुलं आणि दोऱ्यात अर्धवट ओवलेला मोगऱ्याचा गजरा नजरेस पडला.
काकू डिशभर पोहे घेऊन आल्या. त्यावर खवलेलं खोबरं, शेव आणि कोथिंबीर भुरभुरली होती. त्यातही काकूंची रसिकता दिसून आली. सोबत एका ताटलीत लिंबाची फोड आणि पेलाभर पाणी आणून त्यांनी टीपॉयवर ठेवलं. काका थोडंस हसून पोहे संपवत पेपर वाचायला आतल्या खोलीत निघुन गेले.
काकूंच्या घराचं आणि विशेषतः घराभोवती फुलवलेल्या बागेचं कौतुक करत म्हंटलं, "काकू तुमची आवड अगदी युनिक आणि सुगंधी आहे. फुलांच्या रसिकतेबाबत तुम्ही तर साउथ इंडियन बायकांनाही मागे टाकलंत. बालपणापासून तुम्हाला फुलं माळण्याची एवढी आवड होती का?"
"छे गं. बालपणी मी पार उडानटप्पू होते. लग्न होईपर्यंत तर माझा बॉयकट होता. मुलं बघायला सुरुवात केली आणि आईने सक्तीने मला केस वाढवायला लावले. तोच आग्रह पुढे ह्यांचा आणि सासूबाईंचा. केसांचा पोत चांगला होता, मग काय, वाढवले केस.
पहिली दोन एक वर्षं पगाराच्या दिवशी हे न विसरता गजरा आणायचे. मग मलाच दर १ तारखेला गजरा माळला नाही, की चुकचुकल्यासारखं वाटायचं."
"अच्छा, पण कधी कधी तर तुम्हाला मी झेंडूही माळलेला पाहिलाय."
"हाहा, त्याचीही एक गंमत आहे."
"काय बरं?"
"माझा मुलगा मला म्हणायचा, 'एकच दिवस का सुंदर दिसतेस, रोज फुलं घालत जा, रोज छान दिसशील.' माझ्या बाळाची रसिकता पाहून मीही रसिक झाले, रोज फुलं माळू लागले, अगदी झेंडूही मला निषिद्ध नाही!"
"काकू, मला वाटलं रश्मी ताई, तुमची एकुलती एक मुलगी. तुम्हाला मुलगाही आहे? कधी पाहिला नाही, बाहेरगावी किंवा परदेशी असतो का?"
"नाही गं, इथेच असतो आमच्या बागेत, पण फक्त मलाच दिसतो."
"म्हणजे?"
"बालपणीच तो देवाघरी गेला. त्याला रोज पाहण्यासाठी मी ही बाग फुलवली."
"सॉरी काकू, मला कल्पना नव्हती."
"कशी असेल? सर्वांना माझ्या बागेत फुलं दिसतात, पण मला त्यात माझं मुलं दिसतं. गुलाब, चाफा, पारिजात, शेवंती, डेलिया, मोगरा, सदाफुली, सोनचाफा, सोनटक्का, तगर, निशिगंध, गुलबक्षी, झेंडू अशी सर्व प्रकारची फुलझाडं माझ्या बागेत आहेत. म्हणून तर मी आलटून पालटून सगळी फुलं माळते, तर कधी फुलांचा गजरा करते आणि ती निर्माल्य होण्याआधी पुन्हा बागेतल्या मातीत टाकते.
पण माझा एक नियम आहे, मी फुलं कधीच खुडत नाही, जी आपसुख खाली पडतात, तीच वेचते आणि वापरते. कारण, फुलं खुडल्याचं दुःखं काय असतं, ते मी अनुभवलं आहे."
"काकू, तुमच्या मुलाचा फोटो दाखवाल?"
"होsss, बागेत चल दाखवते.... हा बघ माझा अनंत... आहे नं देखणा आणि तितकाच रसिक?"
असं म्हणत काकू खाली वाकल्या. अनंताचं पडलेलं एक फुल त्यांनी माझ्या हातावर ठेवलं आणि दुसऱ्या फुलाचा सुवास घेत त्या गुणगुणू लागल्या, 'अनंता अंत नको पाहू...'
त्याक्षणी मी त्या फुलराणीचा एक वेगळाच गंध अनुभवला.
_*© ज्योत्स्ना गाडगीळ.*_
(आवडल्यास शेअर करताना कथेत कुठलाही बदल न करता कृपया मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही नम्र विनंती. -मेघःशाम सोनवणे 9325927222 )
_*C/P.*_
Comments
Post a Comment