कथा - तो खरचं आलाय... श्री. नंदकुमार वडे र


कथा-  तो खरचं आलाय... श्री. नंदकुमार वडेर

आजही तो प्रसंग जसाच्या तसाच आठवतो.. अगदी काल परवा घडल्या सारखा... खरं तर हि घटना घडूनही बरीच वर्षे लोटली आहेत.. तरी आजही अंगावर अनामिक.. भितीचे शहारे उभे राहतात.. एक अनाकलनीय, अकल्पित घटनेचा तो थरारक अनुभव होता.. झालं असं
...कराड सोडून पुढे सांगलीकडे कार निघाली..रात्रीचे नउ वाजून गेले होते.. भुक लागली होती.. अजूनही तास दिड तासाचा प्रवास होता.. कधी नव्हे तो आभाळ फाटल्या सारखा पाऊस कोसळत होता.. ऐन पावसाळ्यातच तातडीनं रयतानं बोलविलं होतं.. जाणंअटळही होतं..पेठ नाक्यावरील एक धाबा बघून रस्त्यावर गाडी ऊभी केली.. धाब्यात शिरतो न शिरतो तोच वीज गेली म्हणून दिवे रुसून बसले.. गल्ल्यावरील मालकाने वीजमंडळला सणसणीत ठेवणीतली शिवी हासडली..एक दोन मिणमिणते कंदील प्रकाशले.. दोनचारच गिऱ्हाईक होती ती पण लाइट गेल्या नं उठून गेली.. मी एकटाच तिथं बसलो.. मालकानं आपणहून मला काय हवं नको विचारून आँर्डर सेवा केली.. पावसाचा जोर वाढता वाढे होता.. मी खाणं उरकून गल्ल्यावरच्या मालका कडे आलो... एव्हाना त्या धाब्यावर गुडघाभर पाणी साचलं.. मालकाने मला सांगलीकडे जाणार असालं तर कोल्हापूर मार्गे जा म्हणून सांगितले.. गेले आठवडाभर सांगलीचा रस्ता पाण्याखाली गेला आहे..
पूर नव्हे तर महापूराच आलायं.. नद्या ओढे, कालवे  शेती भाती जलमय करून सोडलीय.. नदीकाठचे गाव पाण्यात बुडाली.. हाहाकार उडालाय.. सगळा वाहतूकिचा मार्ग सद्या बदलून गेलाय... मी बरं झालं सांगितले ते आता तुम्ही म्हणता तसाच निघतो असं सांगून त्या गुडघ्याभर पाण्यातून गाडी कडे आलो... 
…पण पण गाडी सुरू होईना.. खुप खटपट झटपट करून बघितली पण छे गाडी ढिम्मच.. कुणाला हाक मारावी म्हणून पाहिले तर.. पाण्याची पातळी पुरुष भर उंचीवर गेली होती.. माणूसच काय आता धाबा सुद्धा निट दिसत नव्हता.. हाँर्न वाजवला पण कुणीच मदतीला येईना... खिडक्या, समोरची, मागची काच बाष्प धरून पांढरी धोट झाली होती..पाऊस थांबण्याचीच वाट बघण्याशिवाय मार्गच नव्हता... आ वासून पसरलेला गडद काळोख.. प्रलयंकारी पाऊस.. मधूनच कडकडीत कडकडणाऱ्या विजेचा लोळ भुमीकडे झेपावत जाई.. बराच वेळ तसाच बसून राहिलो... कुणी तरी खिडकीच्या काचेवर टकटक केल्याचा आवाज ऐकू आला.. मी तिकडे बघितलं तर कुणीच दिसलं नाही.. रस्त्यावर वाहनांची  तुरळकच येजा होती आणि ती वेगात होती.. पार्किंग लाईट कडे पाहूनच पुढे पळत होती... मदत मिळणे खुप कठीण होते.. आणि असं असताना खिडकीच्या काचेवर टकटक कोण करेल.. भास असावा म्हणून सोडून दिले... परत थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज.. मी आता चक्रावलो, मनात भिती वाटू लागली.. पुन्हा धिर करुन पाहिले तर कुठे काय कुणीच दिसतं नव्हतं.. आता जरा खिडकीची काच आतून पुसून घेतली तरीपण पांढरपणा कमी होईना... मी खिडकीतून बाहेरचं बघत राहिलो.. आणि पाहतो तो काय  महाकाय माणसासारखी काळी उंचआकृती खिडकीच्या काचेवर थापा मारत होती.. वीज चमकली तेव्हा अंगावर काळा कोटच दिसला.. चेहरा दिसलाच नाही.. मी आता घाबरून गेलो.. काही झालं तरी खिडकी दार अजिबात उघडायचं नाही हे मनाशी पक्क ठरवलं..आतुनच अदमास घेत राहिलो.. मी त्याच्या थापेला काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहून त्या आकृतीने समोरच्या काचेतून डोकावून पाहू लागली.. पावसाच्या पाण्याने चेहरा ओथंबून गळत होता.. ओठांवर शब्द पुटपुटत होते.. पण माझ्या पर्यंत ते पोहचतच नव्हते.. त़ो चेहराही नीट ओळखता येईना..आता मात्र माझी चांगलीच  फाटली होती.. मी त्याला कुठलाच प्रतिसाद देत नाही म्हणून मग त्याने कधी महाकाय माणसासारखी काळी उंचआकृती खिडकीच्या काचेवर थापा मारत राहिला.तर कधी नुसताच चेहरा अखंड पावसाच्या पाण्याने चेहरा ओथंबून गळत .. ओठांवर शब्द पुटपुटत होता..असं बराच वेळ कधी हे कधी ते दाखवत राहिलं... पण मी कसलीच दाद दिली नाही... हे पाहून त्याने मग चारी खिडक्या, मागची नि समोरच्या काचेवर एकाचवेळी थापा मारू लागला.. तर नुसताच पावसाच्या पाण्याने चेहरा ओथंबून गळत.. ओठांवर शब्द पुटपुटत राहिला..  आता तर आणखीनच माझी गाळण उडाली.. एकाचे चार झाले... आपली धडगत नाही.. मनात रामनाम जपणं सुरू केले..
मी पण डोळे तारवटून बघत राहिलो.. झोप घेण्याचा गाफील पणापासून लांब राहू पाहात होतो.. असा हा रात्री चा खेळ आमचा पहाटे पाचापर्यंत चालला..त्यानंतर पाउस कमी कमी होत होत थांबला.. 
..हळूहळू फटफटीत उजाडू लागलं.. आता तो  दिसायचाहि बंद झाला .. मला थोडसं हायसं वाटलं.. एका मोठ्या अरिष्टातून आपण वाचलो हि देवाची कृपा म्हणायची... असं मनात म्हणत असताना  मी गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला तर काय आश्चर्य ती सुरू झाली..मी क्षणाचा विलंब न लावता गाडी पुढे घेऊन निघालो.. पुढच्या वळणावर चहाची टपरी दिसली.. बऱ्यापैकी गर्दी पण तिथं मला दिसली.. रात्रभर कातावून गेलो होतो आणि चहाची तलफ होती.. कपभर चहा घेऊन तरतरी आणावी नि सरळ सांगली गाठावी.. गाडीतून खाली उतरलो .. चहा सांगितला.. एक गरमागरम चहाचा कप घेऊन उंच च्या उंच काळा कोट घातलेला माणूस माझ्या समोर ऊभा राहीला... मी रात्री पाहिलेला तोच तर  हा ...त्याने माझ्या हाती कप दिला व म्हणाला,काय पावणं लै नशिबवान हायसा बघा.. अवो तुम्ही रात्री त्या फेऱ्यात अडकला व्हता.. म्यां तुम्हाला तत बघितलं आणि तिथनं तुम्ही म्होर जाशिला म्हणून काचेवर थापा मारुन सांगाया बघत होतो.. उंच असल्यानं वाकून खिडकीत त्वांड बी दावता येईना.. म्हणून शान मागच्या म्होरच्या काचंतून सांगून बघत होतो.. पण तुम्ही काही खिडकी उघडाय तयार नव्हता.. मी जर तसचं तुम्हाला सोडून गेलो असतो तर.. आजचा दिवस काही तुम्हाला दिसलाच नसता..'ते तुम्ही होतात होय.. मी पार घाबरलो होतो रात्री.. तुम्ही माझ्या वर खुप खुप उपकार केलेत व मला यातून वाचविले..'."अहो या आठवड्यात लै खुटाणा झालाय.. चार पाच गाड्या ची दैवगती ओढवली असल बघा....मी पुन्हा एकदा त्याचे आभार मानून गाडी घेऊन निघालो..पाउस आता उघडला होता.. पाणी ओसरू लागलं होतं..
मी सांगलीला घरी पोहचलो.. घडलेला प्रसंग घरी सांगितला.. घरच्यांनी मिठमोहऱ्यांनी उतरवून टाकले.. देवाजवळ साखर ठेवली.. .चहा नाष्टा झाला .. आंघोळ करण्यास वेळ होता.. सहज काँटवर पडलेला पेपर उचलला दोन दिवस आधीचा पेपर होता .. वाचता
वाचता एका बातमी वर डोळे खिळले.. पेठ नाक्याजवळील नौबतवाडी गावावर शोककळा,  पुरात अखं गाव वाहून गेले.. माणसांच्या बाँडीज मिळाल्या नाहीत. काशिनाथ धाबेवाला नि साडेसहा फुटी उंच असलेला  हैबती चहाची टपरीवाला .. हे दोघेही या पुरात दोन दिवसापूर्वीच वाहून गेले... अजून माणसं हाती लागली नाहीत....हि बातमी वाचून माझ्या पाया खालची वाळू सरकु  लागली.. कशा कशा वर विश्वास ठेवावा.. काही कळेना चं.. आतातरी मी माझ्या च घरी आहेना...का इथही तो खरचं आलाय....!
(C) नंदकुमार वडेर.
99209 78470

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)