कविता - पिंपळ - इंदिरा संत - माधुरी घारपुरे

आठवणीतील कविता - सौ.माधुरी घारपुरे
                        पिंपळ - इंदिरा संत

आज माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री इंदिरा संत यांची कविता घेऊन आले आहे.
अत्यंत तरल,आणि भाव स्पर्शी कविता लिहिणाऱ्या इंदिरा बाईंचे बालपण तवंदी या खेड्यात गेले. त्याकाळी लोकमानसात लेखन,वाचन,कला या दैनंदिन जीवनापेक्षा स्वतंत्र नव्हत्या.व्यवहारात मिसळून गेलेल्या असायच्या. त्या कलांची जीवनाशी असलेली निकटता आणि त्यांचा उत्स्फूर्त आणि सहज असा आविष्कार ,त्या लयपूर्णतेचा आणि सहज-साधेपणाचा गाढ परिणाम इंदिराबाईंच्या मनात कोरला गेला.पुढे तोच कवितेच्या गाभ्याशी राहिला.
-----------------------------
पिंपळ

दारासमोर अंगणात
उभा पिंपळ तोल देतो
इथे माझ्या खिडकीशी
हिरवे मायाजाळ होतो

उन्हें झुलती पानांतून
फांदीमधून खेळे वारा
झिळमिळत्या पिंपळाची
गाज गंभीर, चमकी ल्हारा

असे खिडकीशी येतां
हिरवा सागर झेपावतो
माझे आनंदाचे पक्षी
लाटांवरती खेळवितो

वारा मिटतो पानांतून
फांदीफांदीत काळोखते
झाकोळत्या पिंपळाचे
पंखमिटले शिल्प होते

असे खिडकीशी येतां
मायाजाळात गुंतवितो,
हात धरून चालवितो,
दुजे माहेर भेटवितो.

- इंदिरा संत
-----------------------------
आकस्मित झालेला पतीचा मृत्यू,लहान वय आणि अशावेळी सासर ,माहेर कुठलाच आधार नसताना, स्वतःचे दुःख बाजूला ठेवून लहानग्या लेकरासाठी त्या सावरायची धडपड करत होत्या.
वर वर जरी दाखवत नसल्या तरी त्यांच्या मनातील दुःख भावना त्यांच्या कवितेत शब्द बनून समावल्या.

त्या बद्दल एके ठिकाणी कवयित्री अरुणा ढेरे यांनी, लिहिले आहे -

" त्या अवघड,शोककारी प्रसंगात सहनशक्तीच्या शोधात इंदिराबाई कवितेकडे वळल्या.आणि दोन्ही परस्परांमध्ये वितळून गेल्या. हे वितळणे एकप्रकारे काचे सारखे होते.भावनांचे नितळ प्रतिबिंब धरणारे,तरी कठीण कणखर.."

असे असले तरी ,त्यांची कविता तिथेच थांबून न राहता, वैयक्तिक दुःखाची  पातळी ओलांडून पुढे जाते. विश्‍वातील दुःखाचे आतले हुंकार त्यांना जाणवू लागतात.

"हळू हळू ती मरण धूळ विरळ होत गेली आणि स्पष्ट दिसू लागला...
प्रचंड ,वृक्षाचा पिसारा....
अस्ताव्यस्त...
आणि सगळे सामसूम."

दुःखातील उत्कटता शतगुणित होऊन निसर्गाच्या वेगवेगळया रूपात विखुरते-

"कातर वेळेवरती थबकुन
    ऐकतील जर पिंपळपानें
उत्तरांतला कडू गोड मध
 शोषतील ती तीक्ष्ण सुईने"

त्यांच्या कवितेतील निसर्ग त्यांच्याशी इतका एकरूप झाला आहे,की मानवी देहात वास करणाऱ्या सगळ्या भावना, जाणिवा,संवेदना त्यांना निसर्गातील घटकांमध्ये आढळतात-

"पारंबी अन् रुक्ष भाबडी
झुलते अल्लद होऊन दोला
मुठी चिमुकल्या उष्ण ओलसर
पिते त्यातल्या अमृत ज्वाला "

निसर्गातील रंगांची मुक्त उधळणही त्यांच्या कवितेत वेधक रूप घेऊन येते-
"रंग विलासी शुक्राचा तर
हर्ष निळा अन् दुःख गुलाबी
उतरे शिंपत विरह जांभळा,
दे जीवाला धुंद शराबी"

"पिंपळ " या कवितेतील हा वृक्ष 'कवयित्री' ला सुखाची चाहूल देत भूलवणारा जादूगार वाटतो. ती समोर येताच, मोहजाल फेकून तिच्या सुखद आठवणींच  पारडं जड आहे असे भासावतो.
लग्ना नंतर माहेर तुटल्याने
मायेची माणसांना पारखी झालेल्या तिला ,पिंपळाचा पिसारा मायेचा हिरवा सागर वाटतो .वाऱ्याच्या झुळकी सरशी  उसळणाऱ्या, चम-चमत्या पानांच्या लाटांवर स्वार होताच, तिच्या मनातील आनंदला उधाण येते.

पण हे सत्य नाही, ....आभास आहे .....
याची जाणीव होताच, तिच्या मना सोबत पिंपळाची सळ सळ थांबते.
मनाला फुटलेले सुखाचे कोंब , झाकोळत्या पिंपळा सारखे कोमेजून जातात. काष्ठ-शिल्प बनून मन अचेतन होते.थिजून जाते.

असे जरी असले, तरी तिला तो आवडतो. त्याला पुन्हा समोर पाहून ती पुन्हा त्याच्यात गुंतत जाते.
तिच्या मनातला वर्तमान काही काळ का होईना पुसला जातो. तो जणू काही हात धरून तिला चालवतो.तिचे जगणे सुसह्य करतो.
जेव्हा कधी आपण विवंचनेत असतो, दुखी असतो , मनाला काही खुपत असते,तेव्हा मायेच्या माणसाला आपण  काही न सांगताही सारे कळते.अशावेळी
तो जरी ,दुःख दूर करू शकत नसेल तरी सांत्वन करतो,मनावर फुंकर घालतो. त्याने काही काळ का होईना शांत वाटते. 

'दुजे माहेर भेटवितो' .....
असं आपोआप मनातून ओठावर येते....

- माधुरी घारपुरे.
८/६/२०२०
(फोटो सौजन्य गुगल)

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)