कथा संग्रह : बंध - श्री. सचिन देशपांडे

* बंध *

सुन्न झाला होता विराज... डोकं गच्च धरुन बसला होता. अचानक फ्युज उडून, घनदाट काळोख पसरला होता त्याच्या डोक्यात. त्याच्या आजुबाजूने बागडणारी त्याची मुलं, त्याला दिसेनाशी झालेली... आणि त्यांचा हसण्या - खिदळण्याचा आवाज कमी कमी होत, ऐकू येईनासा झाला होता. एप्रिल महिन्याचा पगार रडत खडत मिळालेला... मे महिन्याच्या पगाराबद्दल अनिश्चितताच होती... आणि आता बाॅस चा हा मेसेज. मुंबईचा पुर्ण सेट-अप बंद करुन, संपुर्ण बिझनेस चेन्नईला मुव्ह करत असल्याबद्दलचा. थोडक्यात जाॅब जाणार असल्याचा, अप्रत्यक्ष ईशाराच.

बारावीनंतर कोहिनुरमध्ये कुठलासा डिप्लोमा केला होता विराजने. दोन - चार नोकर्‍या बदलत... पाच वर्षांपुर्वी त्याला, ही बरी नोकरी मिळालेली. काहीतरी उरतंय महिनाअखेरीस हातात, हा दिलासा देणारी. आयुष्यात जरासं स्थैर्य आलं होतं... आणि तेवढ्यात उद्भवलेली ही परिस्थीती. पंचेचाळीसचं आडनीडं वय... घरी बसावं तर कमी, आणि बाहेर पडावं तर जास्त ठरणारं. विराजला सुचतच नव्हतं काय करावं नेमकं आता.

त्याची बायको विनिता... अत्यावश्यक सेवेत असल्याकारणाने, रोज आॅफिसला जात होती... दमून - भागून येत होती. हा तिच्यापाठी घरातलं सगळं बघत होता. तिच्या हातात चहाचा कप देत होता, ती आल्या आल्या... तिला कधी उशिर झालाच तर, थोडाफार येत असणारा स्वैपाकही करत होता. विनिताने कधीच काही जाणवू दिलं नव्हतं विराजला... की त्यानेही कधी हयगय केली नव्हती कामांत, उगिचच कमीपणा वैगरे वाटून घेत. काल मात्र एक असा प्रसंग घडला की, ज्यामुळे कमालीचा दुखावला गेला होता विराज मनातून. प्रसंग म्हंटला तर तसा साधाच होता.

विराज अजून झोपलाय असं समजून, विनिता तिच्या कुठल्याशा मैत्रीणीशी फोनवर बोलत होती. बोलता बोलता म्हणाली... "आयता चहा हातात मिळावा कधीतरी, असं खूप वाटे मला पुर्वी... पण आता रोजच मिळायला लागल्यावर, त्याची किंमतच कमी झाली गं... खरंच एकेका ईच्छेचं, गोष्टीचं, ईतकंच काय तर... स्वप्नाचंही व्हॅल्युएशन डाऊन होत चाल्लय". पाणी प्यायला किचनमध्ये चाललेला विराज, तसाच पुन्हा वळला होता बेडरुममध्ये. तासभर मग उगिच लोळत पडला होता अंथरुणावर विराज... चाहूल घेत विनिता आटपून घराबाहेर पडण्याची. तिच्यासमोर जावसंच वाटलं नव्हत त्याला.

"गेल्या दोन महिन्यांपासून आपण घरी आहोत... तर आपली किंमत लागली सुद्धा उतरंडीला?... मग आता बाॅसच्या ह्या मेसेजनंतर काय?... बरं आपलं काम डायरेक्ट मशिनवर... प्राॅडक्शनमध्ये... त्यामुळे हे 'वर्क फ्राॅम होम' चं हत्यारही नाही पाजळायला आपल्याकडे". बराचवेळ भोवतालच्या जगापासून डिस्कनेक्ट झालेला विराज, भानावर आला मोठ्या लेकाने हाॅलचा दिवा लावल्यावर. "बापरे सात वाजले?... म्हणजे आपण तीन तास नुसते बसून होतो?". विराज उठतोय जागचा, तोच बेल वाजली... दारात विनिता उभी होती. विराजला आगामी संकटाची चाहूल लागली होती. सिंक तुडुंब भरलेलं, सकाळच्या नाश्त्यापासुनची भांडी घासायची राहिल्यामुळे. कधिचं बाहेर काढून ठेवलेलं दुध तापवायचं राहिलेलं... जे आता नासण्याची भिती होती. कपड्यांचं मशिनही लागलं नव्हतं. एव्हाना तयार होणारा चहा झाला नव्हता. घरात मुलांनी केलेला पसारा तसाच होता.

ईतक्यावेळात विनिताने घरभर चक्कर मारत, ह्या सगळ्या गोष्टी टिपल्या होत्या. फ्रेश होऊन... टाॅवेलने तोंड पुसत, ती हाॅलमध्ये आली. अंगातलं बळ गेल्यासारखा, सोफ्यावरच बसून असलेल्या विराजपाशी ती गेली. आता ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही असा विचार करत, विराजने मान वर करत विनिताकडे पाहिलं. तिने त्याच्याकडे बघत.. त्याचं डोकं हाताने पकडत, आपल्या पोटाशी कवटाळलं. एक हात त्याच्या हनुवटीखालून गालावर ठेवत, दुसर्‍या हाताने विराजच्या केसांवरुन हाथ फिरवू लागली ती. त्यांचा वयात येऊ घातलेला मोठा लेक, आपणहून आत निघून गेला मग. आपल्या दोन्ही हातांनी विराजचा चेहरा गोंजारत, विनिता बोलू लागली...

"तुझी चाहूल मला आज सकाळी लागली होती, तू बेडरुममध्ये जातांनाची... तू माझं बोलणं ऐकलं असावंस असाही अंदाज आला होता मला... पण मी काही बोलले नाही... तुझा गैरसमज दूर करण्यासाठी, योग्य वेळ यायची वाट बघत होते मी... कारण त्याआधी तुला मी काही समजवायला गेले असते... तर एक म्हणजे तू समजून घेतलं नसतंस... आणि उगिच शब्दाला शब्द वाढत गेला असता... म्हणून मग मी ही काहिच न दर्शवता, आज बाहेर पडले... तुझा कोलिग मुजुमदार... त्याची बायको माझ्याच बसमध्ये असते संध्याकाळची बर्‍याचदा... आजही होती... तिला फोन केलेला तिच्या नवर्‍याने... तुमच्या बाॅसच्या मेसेजबद्दल सांगायला... त्यामुळे मला कळलंय सगळं... तू सांगायच्या आधीच... आणि हिच ती योग्य वेळ आहे तुला सांगायची, मी काल जे बोलत होते मैत्रीणीशी... अगदी खरंय की किंमत कमी झालीये... आयत्या मिळणार्‍या चहाची... मी यायच्याआधी चार शिट्ट्या होऊन, वाफ जाण्यासाठी थांबलेल्या कुकरमधल्या भाताची... मशिन लाऊन झाल्यामुळे, धुवायच्या राहिलेल्या त्या बादलीभर कपड्यांची... आणि भांडी घासून झाल्यामुळे, सिंकमधून उतू जाणार्‍या त्या न घासलेल्या भांड्यांची... ह्या माझ्या फॅन्टेसीज होत्या अरे... आयता चहा 'कधीतरी' हातात मिळावा, आयता भात 'कधीतरी' ताटात पडावा... 'कधीतरी' दिसावी बादली पुर्ण रिकामी, धुवायच्या कपड्यांची... तर 'कधीतरी' दिसावं सिंकही मोकळं, एकमेकांच्या उरावर खरकटी भांडी न रचलेलं... हे 'कधीतरी' खूप मॅटर करत असतं अरे, एका बाईच्या आयुष्यात... आणि तू तर हे सगळंच करायला लागलेलास... माझं काम नक्कीच कमी करत होतास तू... पण त्याची किंमतही... आणि त्यामुळेच ईच्छा, गोष्टी, स्वप्न या सगळ्यांची किंमत कमी होत चाललीये... असं मी म्हणाले, तर त्यात तू कसा काय आलास?... कुठलंही स्टेटमेंट स्वतःला लाऊन घ्यायचंच कशाला पण मी म्हणते?... एक गोष्ट फक्त लक्षात ठेव की, काहीच पर्मनंट नसतं ईथे... बॅड फेज ही... तुझा जाॅब उद्या राहो अथवा न राहो... माझ्यासाठी तू हा तूच रहाशील... अगदी सदैव... मला उपवास धरत... वडा भोवती फेर्‍या मारत, तुझं नवरा म्हणून उदात्तीकरण करणं जसं जमलं नाही कधी... तसंच तुला उगिचच कमी लेखत... तुझ्यावर ओढवलेल्या परिस्थीतीचा फायदा घेत, तुला हिणवणंही जमणार नाहिचेय मला... सो प्लिज रिलॅक्स हो... आणि हो... आज बर्‍याच दिवसांनी घर जरा, आपल्या घरासारखं वाटतंय... तू बस मी फक्कडसा चहा टाकते दोघांना... जर का ते तू कधिचं काढून ठेवलेलं... नी न तापवलेलं दुध नासलं असेल, तर पनिर करेन मी त्याचं... मी येतांना घेऊन आलेय दुध... सो डोन्ट वरी... आणि राहिलेल्या कामांचं बघू नंतर".

विराजने त्याचे दोन्ही हात विनिताच्या अंगाभोवती गुंडाळत, घट्ट चिकटून घेतलं स्वतःला तिच्या पोटाशी. त्यांचा मोठा लेक... नी झोपून उठलेला धाकटा लेकही, येऊन बिलगले मग त्यांच्या आई - बाबांना. एक 'बंध' नव्यानेच उदयास आला होता... एका विस्कळीत मनातील जुन्या गैरसमजाचा, अस्त होऊन.

---सचिन देशपांडे

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)