कथा - अशीच अवचित येऊन जा - श्री. नंदकुमार वडेर
अशीच अवचित येउन जा, अलगद मिठीत मिटून जा---
काँलेजच्या शेवटच्या वर्षात असताना आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी "तुम्हीच माझे प्राणनाथ" हि एकांकिका आमच्या काँलेजने बसविली होती. काँलेजमधील दिसायला सुंदर असणाऱ्या काही मुलं मुलींची निवड त्या करीता झाली होती. मी हडकुळा, उंचआणि काळा सावळा होतो ,तरीही त्या एकांकिकेच्या दिग्दर्शकाने माझी निवड पक्की केली होती. सबंध एकांकिकात शेवटच्या प्रवेशात फक्त काही मिनिटाचा माझा रोल होता. प्रचंड मोठ्या आगीतून मूर्च्छित नायिकेला आपल्या जीवावर उदार होऊन, मी तिला त्यातून वाचवितो.चेहरा आगीने नि काळ्या धूराने रापून गेलेला, हातापायाला ठिक ठिकाणी भाजलेल्या जखमा ,अंगावरच्या कपड्यांची लक्तरे लोंबत असलेली असा मी ,ती शुद्धीत येईपर्यंत तिथेच उभा राहतो.तिला शुद्ध येते, आपले प्राण या तरुणाने वाचवले हे जेंव्हा तिला कळते त्या वेळेस कोणताही किंतु मनांत न आणता मला चक्क मिठी मारते व म्हणते,
" तुम्हीच माझे प्राणनाथ"..वगैरे वगैरे... मग हळूहळू पडदा पडत जातो. एकांकिका संपते.
...या एकांकिकेच्या स्पर्धेपूर्वी जवळजवळ दोन अडीच महिने रोज सकाळ संध्याकाळ तालमी होत होत्या.माझ्या एंट्री च्या वेळेस त्या दिग्दर्शकाने त्या नायिकेला मला कशी मिठी मारायची याचा सुरेख डेमो दाखवत म्हणाला ,
" हि आणि अशीच मिठी प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी जमली पाहिजे, हा या एकांकिकेचा क्लायमॅक्स आहे." मग सबंध त्या दोन अडीच महिन्याच्या तालमीत त्या नायिके ऐवजी दिग्दर्शक स्वतः येऊन मला मिठी मारायचा आणि .."तुम्हीच माझे प्राणनाथ "वगैरे वगैरे डाँयलाँग बोलून तालीम संपवत असे...
मी एकदा दोनदा त्यास सुचवून पाहिले कि त्या मिठीची तालीम सुद्धा पूर्णपणे त्या नायिकेकडून करून घ्यावी म्हणजे आयत्यावेळी घोळ तो होणार नाही. यावर त्याने म्हारक्या म्हशी च्या नजरेने माझ्याकडे पाहिले, व म्हटले,
"त्याची काही एक जरुरी नाही. त्यावेळेला ती मिठी अगदी नँचरल अशीच दिसेल हा माझा विश्वास आहे.तालमी पुरता मीच नायिका म्हणून तुला मिठी मारत जाईन आणि एकांकिका संपेल".
एव्हाना त्या नायिका म्हणून काम करणाऱ्या सुंदर नाजूक मुलीवर लट्टू झालेल माझं मन, त्या दिग्दर्शकाच्या तसल्या बोलण्याने खट्टू झाले. पण मिठीचा तो डेमो नि हि आणि अशीच मिठी प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी जमलीच पाहिजे , हा या एकांकिकेचा क्लायमॅक्स आहे हे त्याचे वाक्य माझ्या मनांत सदैव गुंजत राहिले. म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगाच्यावेळी तरी तिला मला मिठी मारावी लागेलच, मग जाईल कुठे?,तिथे काही हा खडूस दिग्दर्शक कसा बरे कडमडेल. अगदी पडदा पडून गेला तरी मी काही तिला मिठीतुन लगेच सोडणार नाही... उलट तिच्या कानात सांगेन,
' तु मला खूप खूप आवडतेस..I love you Darling.' आणखी काही बाही सांगुन हळुच तिच्या कोमल मुलायम गालाचा गोड चुम्मा घेऊनच तिला मिठीतून सोडायचे असे मनोमनी छान प्लॅनिंग करून ठेवले होते व त्या प्रत्यक्ष प्रयोगाच्या दिवसाची चातकासारखी वाट पाहात होतो...
...आणि तो प्रयोगाचा दिवस उजाडला, माझ्या छातीची धडधड जोरजोराने वाढत जात होती. घशाला कोरड पडत होती. दहा वेळा पाणी पिऊन झाले होते. नाटकातली का असेना पण आज पहिल्यांदा एका मुलीला आपण मिठीत घेणार आहोत, या कल्पनेनेच सारे अंग रोमांचित झाले होते. बरोबरीच्या मित्रांना याबद्दल काय सांगायला जावे तर ते माझी टर उडविल्या खेरीज राहणार नाहीत या भितीने कुणालाच काही बोललो नाही. काय व्हायचे ते होऊ दे मग बघू अस म्हणून मनाची समजूत काढली.
, सुरुवातीपासून रंगतदार होऊ लागली.. आता क्लायमॅक्स आला...माझी एंट्री....
चेहरा आगीने नि काळ्या धूराने रापून गेलेला..हातापायाला ठिक ठिकाणी भाजलेल्या जखमा... अंगावरच्या कपड्यांची लक्तरे लोंबत असलेली असा मी ती शुद्धीत येण्याची वाट बघत तिथेच ऊभा. तिला शुद्ध येते, या तरुणाने आपले प्राण वाचविले हे जेव्हा तिला कळते ,त्या वेळेस मनांत कोणताही किंतु न आणता तिने चक्क माझ्या पायावरच आपलं डोकं ठेवत ती म्हणाली,
" आज तुमच्या मुळे मला पुर्नजन्म मिळाला.. तुम्हीच माझे प्राणनाथ आहात...'" वगैरे वगैरे... मी हतबुद्ध पणे अवाक होऊन तिच्या कडे बघतो, जे एकांकिकेत मुळातच नव्हते आणि मला बसलेला अनपेक्षित धक्का पाहून त्या नायिकेच्या चेहऱ्यावर एक मिस्कील खट्याळपणाची मंद स्मित रेषा चमकलेली दिसली.... मी तिला हात धरून ऊठवणार तोच त्या दिग्दर्शकाने सुद्धा एंट्री करता करता म्हणाला,
" शामला! माझी शामला काही लागले नाही ना तुला... तु मला खूप खूप आवडतेस...I love you Darling..." आणखी काही बाही बोलून हळूच तिच्या त्या कोमल मुलायम गालाचा चुम्मा घेत माझ्या समोरच तिला घट्ट मिठीत घेतले नि माझ्या कडे म्हारक्या म्हशीगत नजरेने पाहिले.ती नायिका देखील माझ्या डोळ्यादेखत अलगद त्याच्या मिठीत सामावून जात म्हणाली,
" नाही रे राजा, या देवदुतामुळेच सुखरूप वाचली तुझी शामला..."
...तिकडे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि इकडे माझ्या हृदयी मात्र प्रेमाचा चकोर त्या स्वप्नातल्या मिठीसाठी तडफड तडफडला....।।
(C) नंदकुमार वडेर.
9920978470.
Comments
Post a Comment