कथा - पिंपळाची पिल्ले - अनंत गद्रे
पिंपळाची पिल्ले
ठाण्यात आमच्या सोसायटी पासून पाव ते अर्ध्या किमी इतक्या कमी अंतरावर मखमली, सिद्धेश्वर व कचराळी हे तीन तलाव आहेत. इमारतीच्या मागच्या कंपाऊंडला लागून नाला आहे. जो पावसाळयात येऊर पासून उतारावरून वहात येणाऱ्या पाण्याने खुप फुगतो. या सगळ्यामुळे आमच्या परिसरांत खुप विवीध झाडे आहेत. पिंपळ आहेत. इतरही बरीच झाडे आहेत. जांभळाची, आंब्याची, जंगली बदामाची आहेत. वड, उंबर आहेत. शहिद उद्यानात ताडाची खुप आहेत.भरपूर ताडगोळे काढतात सिझनमधे इथले स्थानिक. नव्याने लावलेले सोनंमोहोर, रेन ट्री आहेत. साग, सप्तपर्णी, करंज आहेत.
या सगळ्या झाडांमुळे या भागात कावळे, चिमण्या, कबुतरे, बुलबुल आहेत. सकाळी व संध्याकाळी शेकडो पोपट येतात अन जातात. साळुंक्या आहेत. दयाळ, नाचण नियमित हजेरी लावतात. फुलचुखे येत असतात. तांबटाची टुकटुक ऐकू येते दिवसभर. वसंतात कोकीळेची साद नेहमी कानी पडते. मागच्या ओढ्यामुळे त्याच्याकाठी गायबगळे, पाॅंड हेराॅन, नाईट हेराॅन यांचा रोजचा वावर असतो. इथे दोन तीन पाणकोंबड्यांच्या जोड्या देखील आहेत. ओढ्याच्या भिंतीतल्या पाईपांमधे खंड्याची घरटी आहेत. त्यांची पिल्ले नाल्या काठच्या फांद्यावर बसलेली असतात.
इतकी सारी फळझाडे अन विविध पक्षी, त्यामुळे सहाजीकच माझ्या सोसायटीच्या आवारात पिंपळाची पिल्लेही खुप उगवलेली दिसतात. इमारतींच्या, कंपाऊंडच्या भिंती लगंत, भिंतीवर, दगडांच्या, पायऱ्यांच्या बेचक्यात, ओपन पार्कींगच्या आवारात, अगदी कुठेही. इतका मोठा होणारा वृक्ष, पण किती सहज कुठेही रुजतो. ही सगळ्या पक्ष्यांची करामत. अन अर्थातच निसर्गाची. त्या पक्ष्यांच्या पोटातून याच्या बिया रुजण्यायोग्य प्रक्रिया होऊनच त्यांच्या विष्ठेमार्गे जमिनीवर, भिंतीवर अगदी कुठेही पडतात. त्यांची अगदी विनासायास म्हणतात तशी ‘नाॅर्मल डिलीव्हरी’ होते. अन या बाळांची वाढ तिथे होऊ लागते.
यातली बरीचशी पिल्ले , पिल्लेच राहतात. कारण ती रुजतात खरी. पण पुढची वाढ होण्यासाठी ती जागा योग्य नसते. ते ही ठीकच आहे म्हणा. नाहीतर सगळीकडे पिंपळच पिंपळ होतील. डोळखांबला मात्र माझ्या बागेत पिंपळ नाहीये. त्या जवळपासच्या परिसरातच नाहीये. इथली पिंपळपिल्ले मी तिकडे नेऊन लावायचा प्रयत्न देखील केलाय. पण अजुन यश आलेला नाही. मी ही अर्थात पाठ सोडली नाहीये. पाहू.
पिंपळ. भारतातला एक अतिप्राचीन वृक्ष. धार्मिक दृष्ट्या महत्व असलेला. म्हणून याच्या लॅटिन नावातही ‘रिलीजन’ आहे. नावं आहे ‘फायकस रिलिजिओसी’. पानाचा आकर्षक आकार. त्याची गुलाबी पालवी. नंतर तांबडी व मोठी झाल्यावर हिरवी होणारी. पालवी वरच्या रेषा. पाने सतत सळसळणारी, हलणारी म्हणून ‘चलदलः’ हे ही नाव पडलय. उत्तम सावली देणारा हा वृक्ष आहे.
असा हा पिंपळ.
अन त्याची ती प्रतिकुल परिस्थती मधेही तग धरणारी, जगाण्यासाठी धडपडणारी बाळे.
अनंत गद्रे
Comments
Post a Comment