"स्वप्न…. त्याचं आणि….. तिचं …!

 “स्वप्न…. त्याचं आणि….. तिचं …!           
                                                                     
                                                                                              डॉ. सूरज चौगुले. इस्लामपूर

              चिमुकल्या हातांनी जेव्हा तिने आपल्या बाबांच बोट पकडलं त्याच वेळी तिने स्वप्नांनाही आपल्या इवल्याश्या तळहातावर घेतलं होतं. फुल-पाखरांनी अलगद तळहातावर आपले रंगीबेरंगी रंग सांडावेत तशी तिची स्वप्न तिच्या मनात घर करून बसली आणि मग तिच्या प्रत्येक पावला बरोबर एक नवं स्वप्न तिच्या इवल्याश्या मनावर आपला नवा रंग ठेवून जात होतं. स्वप्न ही किती आरपार जाणारी आणि पारदर्शक असणारी. कधी दुधा सारखी दुधाळ पांढरी तर कधी इंद्रधनुष्याच्या रंगा सारखी. ती स्वतःहून विरून  जायची पांढऱ्या धुक्यात, तर कधी स्वतःचाच इंद्रधनुष्य करायची तयार. आपल्याला हवा तो रंग घेऊन. ! तिच्या इंद्रधनुष्यामध्ये तिचेच रंग ! हवे ते हवे तसे, तिच्या स्वप्नांचे पेटंटही तिचं होतं, त्यावर आणखी कोणाचा अधिकार नव्हता. स्वप्नात यायची-  फुलपाखरं, चॉकलेटचा बंगला, परिचा दरबार आणि खूप काही. रंगून जायची यामध्ये तीपण, मध्येच एखादा राक्षस तिला स्वप्नात भीती घालायचा पण असल्या स्वप्नांना तीने चौकटी बाहेरच ठेवलं होतं.

              आता काहीशी ती थोडी मोठी झाली होती. स्वप्न होतीच सोबतीला, पण स्वप्नांचे रंग बदललेले, स्वप्नातली पात्र बदललेली आणि अचानक गुलाबी रंग तिच्या अवती भोवती पिंगा घालू लागला. स्वप्नातला राजकुमार घोड्यावरून नाही तर बाईक वरून तिच्या अवती भवती फिरू लागला स्वप्नांनी डोळ्यांना एक नवीन नजर दिली, पापण्यांना शरमं दिली, गालांना खळी दिली, ओठांना लाली दिली आणि आजपर्यंत ची तळहातावरची बागडणारी फुलपाखरी स्वप्न तिच्या अंगात सामावली .आता या स्वप्नांची किंमत वाढली होती. परंतु ती स्वप्न नाजूक नव्हती तर टिकाऊ आणि भरजरी होती काल पर्यंत ची स्वप्न स्मृतीतून विरून जाणारी पण ही स्वप्न मात्र न कोमेजता सुगंध देत राहणारी.

                  ' तो' लहान असताना त्याला ही स्वप्न पडायची आणि तोही आपल्या चिमुरड्या हातांनी आपल्या आईचं बोट पकडत स्वप्नांना डोसनी मारायचा. फुलपाखरांनी त्याच्याही मनावर परिणाम केला, परंतु तो त्यांच्या रंगा पेक्षा त्यांना आपल्या मालकीचं बनवण्यासाठी त्या स्वप्नात मागे धावू लागला. चॉकलेटचा बंगला त्याला जास्त रुचला नाही, त्यावेळी बाहुलीही त्याला भुरळ घालू शकली नाहीत. त्याचे स्वप्न बंदुकीचे, मारामारीची, त्याची स्वप्न- खेळण्याची आणि मोडण्याची. पण तिच्यासोबत त्याच्यावरही वयानं जादू केली आणि आता म्हणे त्याच्याही स्वप्नाचा रंग गुलाबी झालाय, आता मात्र दोघांच्या स्वप्नाचा रंग एकच. अलीकडे तो फुलपाखरांना अलगद न्याहाळतोय. हळुवार दृष्टीचा ही धक्का न लावता आपल्या स्वप्नांना गोंजारतोय. दोघांनाही आपली किमती, मौल्यवान स्वप्न जपायची आहेत. जिवा पेक्षा मौल्यवान स्वप्नांना त्यांनी आपापल्या मनाच्या तिजोरीत सुरक्षित ठेवले.

                  परवा घरातील सर्व रद्दी धुंडाळून काढावी तशी त्या दोघांनीही मनाचा कोणाडा झाडून काढला. दोघांनीही आपली किमती मौल्यवान स्वप्न बाहेर काढली आणि "विवाह" नावाच्या दुकानात ती मोडीला घातली. त्या स्वप्नांच्या मोडीतून आलेल्या रकमेतून तिनं आपल्यासाठी एक नवरा घेतला आणि त्यानं आपल्यासाठी एक नवरी घेतली आता ते आपापल्या घरी संसार करतायत म्हणे…...


                 डॉ. सूरज चौगुले.      इस्लामपूर
                                                                      9371456928

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)