कथा : खांद्याला-खांदा - डॉ. सुरज चौगुले

                    "खांद्याला-खांदा"
                 डॉ.सूरज चौगुले इस्लामपूर
       संध्याकाळी चार वाजता रमा प्राचार्यांच्या केबिन मध्ये गेली. आत जाताच तिने विचारले," सर उद्याची बऱ्यापैकी सर्व कामे पूर्ण केलीत, थोडं साहित्य खरेदी करायचा आहे ते मी करते, नाहीतर 'चौधरी'सरांना सांगते. आणि हो ! उद्या मी थोडं लेट आले तर चालेल का?" प्राचार्यांनी डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर चढवत तिच्याकडे पाहीले आणि म्हणाले," मॅडम वेळ सर्वांसाठी सारखीच, अन तुम्ही तर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहात.सारा कार्यक्रम तुमचा आहे अन तुम्हीच लेट..?" " हो पण आज मी बराच वेळ थांबले ना! उद्या थोडी सवलत द्या घरी काही माझी काम आहेत." रमा विनवणीच्या स्वरात म्हणाली. गोलंदाजाचा चेंडू बरोबर बैटवर यावा अंन त्याला फटकारायला संधी मिळावी या आवेशात  प्राचार्य उद्गारले," पगार घेताना सवलत मागता का?घरची कामे आहेत म्हणून चार पैसे कमी घेता का ? का   प्राचार्याला देता?तिथे समानता..!अन  जबाबदारी आली की मात्र सवलत...! ते काही नाही नियम सर्वांना सारखाच...या तुम्ही..!" दिवसभराच्या सर्व कामाचा समारोप असाच होणार होता. त्यामुळे प्राचार्यांच्या बोलण्याचे तिला फारसे काही विशेष वाटले नाही. बाकीचे सहकारी प्राध्यापक तर दुपारीच गेले होते. कमिटी मेंबर म्हणून मात्र चौधरी सर, पांडे सर तेवढे थांबले होते, ती स्टाफ रुममध्ये आली, दरम्यान पांडे सर गाडीला किक मारून निघून गेले तर चौधरी सर जाण्याच्या मार्गावर तिची वाट पाहत होते. तीही गडबडीने येत सरांना म्हणाली, "सर उद्याचा हे थोडं साहित्य तुम्ही खरेदी करता का ?कारण आता इथून पुढे मी जाऊन त
खरेदी करन  शक्य नाही, प्लीज.! चौधरी सर चमत्कारिक नजरेने तिच्याकडे पहात म्हणाले," मॅडम तुम्ही म्हणताय म्हणून.... लक्षात ठेवा आम्ही पण  कामं  करतोय "तुमची"....."माझी काम...?" ती रागाने बोलणार होती परंतु तिने आपले शब्द आतल्या आतच गिळले आणि खोटे हसत म्हणाली, "प्लीज सर...!" चौधरी सर वस्तूंची लिस्ट आणि पैसे घेऊन निघून गेले. रमाने लगबगिने  आपली पर्स डबा घेतला अंन धप-धप पावले टाकत ती बसस्टॉपकडे चालत निघाली.

       उद्या तिच्या कॉलेजचा वार्षिक पारितोषिक समारंभ होता. ती सांस्कृतिक विभागप्रमुख होती त्यामुळे गेली चार दिवस ती सर्व नियोजन करीत होती.आज ही सर्व कामे आठपुन बस स्टॉप वर आली. इथून पुढे तीस-पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून तिला कोल्हापूरला जायचं होतं. कोल्हापूर ते तिचं महाविद्यालय किमान 45 मिनिटांच अंतर परंतु प्रवासात तास-दीड तास जायचा. आज कोल्हापुरात यायला तिला सहा वाजले होते. कामाच्या त्रासापेक्षा आपसातील प्रचंड हेवेदावे, डाव-प्रतिडाव आणि वायफळ निरर्थक चर्चेने तिची परतीची पावले नेहमीच जड व्हायची. आज तर थकलेल्या अवस्थेत ती उद्याच्या राहिलेल्या साहित्याची जुळवाजुळव करीत  घरी येत होती. कोल्हापुर बस स्टैंड वर वरून बाहेर येत तिने पटकन स्वतःला वडाप मध्ये कोबुंन घेतल आणि काही क्षण वडाच्या गर्दीचा एक भाग बनली. वडाप मधील गाणी अन मरगळलेल्या घामाचा दर्प तिच्या नेहमीच्या सवयीचा होता. ती स्टॉप वर उतरली आणि पाय ओढीत आपल्या अपार्टमेंटकडे निघाली, तेवढ्यात एका कोपऱ्यावर तिला गजरेवाला दिसला. गजरेवाला पाहताच तिच्या चेहऱ्यावरची दुपारपासूनची मरगळ जादू करावी तशी गायब झाली,मघाचा तो दर्प गायब झाला, मोगर्‍याचा मंद सुगंध तिच्या सभोवती दरवळू लागला तिला, अचानक उद्याच्या कार्यक्रमातील आपल्या नटण्याचे तिला वेध लागले. गजरे पाहताच पटकन उद्या साठी कोणती साडी? कोणता ब्लाउज ?बांगड्या ..?हेअर स्टाईल ..?हे सारे विचार तिच्याभोवती पाखरं  गोळा व्हावीत तशी गोळा झाली. ती,गजरेवाल्या जवळ गेली अन भरपूर गजरे खरेदी केले. आपल्या सोबत सावंत मॅडमसाठीही तिने गजर्याची एक लड घेतली. क्षणात तिचा मूड बदलला आणि उद्याच्या आपल्या स्वतःच्या तयारीबद्दल विचार करीत ती वेगाने घरी आली.

           घराची बेल वाजवताच सात वर्षाच्या गीताने दार उघडले. इकडे तिकडे पाहतच तिने  मुलीला विचारले, "पप्पा कुठे आहेत? पवन. ...?मावशी कधी गेल्या ?"एका दमात विचारलेल्या प्रश्नांची, उत्तरेही न ऐकता ती बेडरूम मध्ये गेली. तिथे पवन बेडवर झोपला होता. पाच वर्षाचा पवन तिचा  मुलगा, मधल्या दोन मुलींना वाटेतच पाठीमागं पाठवून हा जन्माला घातलेला. जन्मताच अपंग,  मूकबधिर.. झोपल्या जागेवरच हातापायांच्या अस्तव्यस्त  हालचाल करीत तो पडला होता. कदाचित बेडवरच त्यानं शी..शु..केलेलं, रमाने सर्व साहित्य एका टिपॉयवर ठेवले आणि ती पटकन पवन जवळ गेली, आता मघाचा तिचा उत्साह अचानक सिनेमाच्या थियटर मधील लाईट अचानक बंद व्हाव्यात अन काळौख पडावा अशा पद्धतीने लख्ख मिठुन  गेल्या होत्या."बाबा त्यांचे काही साहित्य आणायला दुकानात गेलेत, तर मावशी दुपारीच गेली, मी दादा जवळच होते" गीता सांगत होती, हे सारं ती ऐकत होती.ती पवनला बाथरूम मध्ये घेऊन गेली, त्याला आंघोळ घातली, बेडशीट बदलली, सर्वत्र अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू उचलून तिने स्वतःचे कपडे बदलले आणि किचन मध्ये घुसली. स्वतःसाठी एक कप चहा पिऊन घ्यावा हा तिचा विचार हवेतच विरून गेला.

     रात्रीचे जेवन,पवनला चारण्ं, गीताचा अभ्यासं, जेवणानंतरची भांडी, किचन कट्टा, आवरत आवरत साडेदहा वाजले. ती बेडरूम मध्ये आली, पवन अंकिता दोघेही झोपले होते. प्रदीप बेडवर पडून मोबाईल पहात होता ती, आत आली आणि अचानक तिची नजर गजर्यावर गेली.पुन्हा एक सुगंधी लहर तिच्या अंगावरून गेली. त्या कागदात गुंडाळलेले गजर्याच्या लढी तिने उचलल्या, किचन मध्ये आणून त्याच्यांवर थोडासा पाण्याचा शिरकाव केला. आता पुन्हा तिच्या अवयवांना गती आली होती. ती पुन्हा आपल्या साड्यांच्या कपाटा जवळ गेली. उद्याच्या कार्यक्रमात नेसण्यासाठीच्या साडीचा शोध ती घेऊ लागली. घडी मागून घडी  उलगडीत,प्रत्येक साडी आपण कधी नसलो होतो, हे आठवत होतीच परंतु ती आपण कधी घेतली होती याचा इतिहासही मनात ताजा करीत होती. शेवटी पसंत केलेल्या साड्या मधून ही सर्वाधिक पसंतीची पार्टी वेअर साडी तीने निवडली, साडीच्या घडीतील ब्लाउज काढला, अचानक तिच्या मनात शंकेची पाल कुचकुचली आणि ती दूसऱ्या रुममध्ये जाऊन ब्लाऊज घालून बघून परत आली, येताना तिच्या हातात ब्लाउज सोबत ब्लेडचे पान होतं, तिने स्वतःलाच आरशासमोर उभं केल. त्या काळजीच्या स्वरात पुटपुटली," काय हे किती टीपा उसवायच्या? उसणार्या ब्लाऊज च्या प्रत्येक टिपे बरोबर ती आपला भूतकाळ आणि आपल्या वाढत्या वयाबरोबरच वाढणाऱ्या तब्येती बद्दल चिंतित झाली, परवा जेव्हा शेजारच्या चव्हाण वहिनी घरी दुधाचे भांडे घ्यायला आल्या होत्या, तेव्हा त्याच्या जाण्यानंतर प्रदीप म्हणाला होता," काय ग चव्हाण वहिनी अजून तशाच स्लिम ट्रिम आहेत ना...! या वाक्यसरशी  रमान ब्लाउजची शेवटची टीप उसवली आणि पुन्हा एकदा बसतोय का याची खात्री केली. ब्लॉजवर इस्त्री फिरवून उद्याची बऱ्यापैकी तयारी करून ती आपल्या बेडरूम मध्ये आली.प्रदीप अजुनही मोबाईलवरच होता. रमाच्या पावला सोबतच तिचे डोळेही जड झाले होते, कधी एकदाच अंग टाकते असं तिला झालं होतं. रमाला आलेले पाहताच त्यांने मोबाईल बंद केला आणि बेड वरून रमाला हात दिला. प्रदीपच्या स्पर्शात ओढ होती ती रमालाही जाणवली परंतु तिची ओढ पूर्ती ढिली झाली होती,तरीही  अचानक तिला चव्हाण वहिनी बद्दलचे प्रदीपचे वाक्य पुन्हा आठवले आणि मनात नसतानाही तिने स्वतःला प्रदीपच्या स्वाधीन केल.

        पहाटे चार वाजता ती उठली आठ वाजता तर तिला कॉलेज वर पोहचाव लागायचं आज तर वेळ करून चालणार नव्हती. ती पटकन उठली स्वतःच आवरत तिने गीताला उठवल गीता साडेसात वाजता शाळेत जायची परंतु सकाळी सहाच्या हातच तिच आवरून ठेवाव लागायचे. रमा किचन मध्ये घूसली, स्वत: साठी,प्रदीप अन गीताच्या डब्यासाठीच्या चपाती-भाजी, पवनला लागणारे जेवण हे सारं तीने सवयीने तयार केले, प्रदीप नऊला घराबाहेर पडायचा, तो पर्यंत मावशी यायच्या पुन्हा दिवसभर त्या पवनला सांभाळायच्या.परंतु आपल सकाळचं जेवण डबा आठपुन रमा ला पवनला उठवाव लागायचं,कारण  मावशीला त्याला आंघोळ घालणं शक्य नव्हतं. नेहमी प्रमाणे त्या दिवशीही तिने पवनला उठवलं, झोपेतच तोही धडपडत उठला, अशा अवस्थेतच रमा त्याला घेऊन बाथरूम मध्ये गेली. गरम पाण्याने अंघोळ घातली. झोप मोड झाल्याने तो रडू लागला, परंतु रमाला हे सार सवईच होतं, "नाही हं माझं बाळ..! माझं सोनं..!" असंच चुचकारत तिने त्याला बाथरूममधून बाहेर काढलं, त्याचं अंग पुसून घेतलं, अंगावर टॅल्कम पावडर मारून त्याला कपडे घातले आणि पुन्हा त्याला त्याच्या जागेवर झोपवल्ं, त्यानंतर तिने आपला मोर्चा गीता कडे वळवला तिला आंघोळ घालून आत्ताच तिला शाळेचे कपडे घालून बसवले, तिची शाळेची बॅग,जेवणाचा डबा, रुमाल सार काही काढून ठेवत तिची वेणी घालून खुर्चीवर बसवले, थोड्यावेळाने गीता ही पेंगत पुन्हा झोपी गेली. हे ही रमा अन गीताला ही सवयीच  झालं होतं. प्रदीप वर गीताला शाळेतल्या रिक्षात बसवायची जबाबदारी असल्याने प्रदीप सात पर्यंत उठण्याचा काही प्रश्नच नव्हता आणि हे त्यालाही सवयीच  झालेलं. दोन्ही मुलांचा आवरून त्यांना पुन्हा झोपूऊन रमाने आपली अंघोळ आटोपली, ड्रायरने केस वाळवले  खरं तर ती आज केस मोकळे सोडणार आहे परंतु कॉलेज वर जाई पर्यंत तिने  वर घट्ट बांधून टाकले. कालची निवडलेली साडी नेसली," किती बरं झालं असतं तिथे जाऊन साडी नेसता  आली असती.? आता पुन्हा प्रवासात ही साडी... सर्व आवरण्ं या गोष्टीवर ती थोडी नाराज झाली, पण पर्याय नव्हता. तिने आपला मेकअप बॉक्स उघडला, त्यातील थोडे साहित्य बाहेर काढलं  काय घ्यायचं अन काय ठेवायचं हे तिला सुचेना. "पुरुषांचं बर असतं एक कंगवा मागच्या खिशात ठेवला आणि एक रुमाल समोरच्या खिशात ठेवला की झालं, बाकी हात रिकामे आतल्या अंगाला 6-7 खिसे असुनही हे महाभाग रिकामे... आणि बाईच्या साडीला एकही खिसा नसताना ती मात्र आतल्या गाठीची...!" असा स्री-पुरुष फरक मनात घोळवत ती पर्समध्ये साहित्य कोंबु लागली. नेहमी सोबत पर्स बाळगायचा तिला कंटाळा यायचा. साधी एखादी वस्तू ठेवायला हँड पर्स, हॅन्ड पर्स ठेवायला मोठी पर्स, मग मोठी पर्स आली की गळ्यात काय आणि खांद्यावर काय अडकवन आलंच, अडकवायला बंद झाले, बंद झाले की बंधने आलीच. "मेलं बंधण म्हणजे बाईच्या जातीचं दूसरं नाव." तिच्या विचारांच्या तंद्रीतच तिने सर्व गजरे एका कॅरीबॅगमध्ये घातले.डब्बा पाणी बॉटल व काही अन्य साहित्य दुसऱ्या  बॅगेत घेतले. घड्याळ्याच्या काट्यावरच तिने चहा बिस्किटे खाल्ली. सकाळी पाण्याचा एक घोटही घेणे तिच्या जिवावर यायचं कारण सकाळच्या प्रवासात वॉशरूमची खूप मोठी अडचण तिच्यासमोर असायची. साडे सहाला प्रदीपला आतून कडी लावून घेण्यासाठी तिने उठवले, "तरीही आवर तुझ, चल लवकर."  म्हणत तो दारापाशीच उभा राहिला. तरीही पायात चप्पल सरकवत रमाने त्याला विचारलं,"अहो साडी कशी दिसते सांगा ना....! "हा  मस्तच... आणि लवकर ये संध्याकाळी, बसू नको तिथे गप्पा मारत.." रमा यंत्रवत बाहेर पडली, दोन पावलं पुढे जाऊन प्रदीप ला पाहण्यासाठी पुन्हा ती पाठीमागे वळली तोपर्यंत प्रदीपने दार लावून घेतलं होतं.

         अपार्टमेंट खाली येताच कावळ्याच्या नजरेने उभा असलेला वॉचमन तिला उद्देशून बेरक्या स्वरात म्हणाला," काय मॅडम निघाला का..? आज काय कार्यक्रम आहे वाटतं ?" "हो निघाले" म्हणतं ती पटकन बाहेर पडली. मुख्य रस्त्यापर्यंत चालत येता येताच ती वडाप शोधू लागली, थोडा वेळ थांबली तो पर्यंत एक रिक्षावाला आला.रिक्षात मागे कोणीच नव्हतं,तिच्या जवळ थांबवत रिक्षावाल्या ने विचारलं," कुठे जाणार".." स्टँडवर परंतु वडापणे" ती."बसा"...खर तर सकाळी  सकाळी रिक्षात एकटीच बसंण्ं तिच्या जीवावर आलं होतं,ती नेहमी वडापने जात असे परंतु आज तिला लवकर पोहोचायचं होतं. ती रिक्षात मध्ये बसली, रिक्षा सुरु झाली, थोडं अंतर जाताच रिक्षावाल्याने आपल्या समोरचा आरसा हलवला. रमाचं लक्ष त्या आरशात गेलं, रिक्षावाल्याची अन तिची नजरानजर झाली अचानक विज चमकावी तशी नजर चुकवीत तिने आपली नजर बाहेर ठेवली. तरीही रस्ताभर रिक्षावाला आरसा हलवतच राहिला. शेवटी उतरल्यावर बिल देतानाही मोठ्या प्रयत्नाने त्याने आपलं बोट नोटे बरोबरच रमाच्या बोटाला लावलचं.. त्याच्या या"हावर्या"  स्पर्शाची जाणिव होऊन ही न झाल्या सारखी दाखवत रमा पाठमोरी झाली. 06:50 ची बस लागली होती. सवयीने रमा स्टैंड वर आली की प्रथम वॉशरूमला जाऊन येते परंतु आज ती गाडी जवळ यायला अन गाडीत ड्रायव्हर चढायला एकच वेळ आली. ती सरळ गाडीत चढली, बहुतेक पुरुष एक एक जण एका-एका सीटवर बसलेला. कंडक्टरच्या सीट च्या पुढे बसलेल्या एका निमवयस्क सभ्य वाटणार्या व्यक्ती जवळ तिने स्वतःला बसवलं, गाडी सुरु झाली. सकाळची गाडी प्रत्येक स्टॉप घेत जात असल्यामुळे ती चालू किती वेळ अन थांबली किती वेळ हेच करायचं नाही.रमा सभ्य गृहस्थ समजून ज्याच्याजवळ  बसली होती तो सभ्य गृहस्थ ही जसं जशी गाडी पुढे जाऊ लागली तस-तसा रमाला असभ्य वाटू लागला. "माणसाच्या कपड्यावरून त्याच्या शरीराराचा अंदाज लावता येत नाही तसंच त्याच्या चेहऱ्यावरून ही त्याच्या सभ्यतेचा  अंदाज लावता येत नाही." रमाने आपला निषेध नोंदवत दोघांच्या मध्ये पर्स ठेवत तिरक्या नजरेने त्या व्यक्तीकडे पाहिले, अचानक पुन्हा त्याच्यातील सभ्यपणा जागा झाला.

         गाडी बरेच अंतर आल्यानंतर ज्याची हुरहूर होती तेच झाले, कधी एकदा आपण कॉलेजवर पोहोचतोय अन कधी एकदा आपण वॉशरूमला जातोय असं तिला झाले होते. गाडी आपल्या गतीने चालली होती. एका स्टॉप वर गाडी थांबली आणि एका पॅसेंजर कंडक्टरला आपल्या उजव्या हाताची करंगळी दाखवत म्हणाला," मास्तर दोन मिनिटात आलो". रमाला त्याच्या करंगळीचा संकेत कळाला कारण तिची ही वेदना तीच होती. माणूस म्हणून वेदना सारखी असली तरी एक बाईमाणुस  होती आणि दुसरा गडीमाणुस होता आणि अजूनही बाईच्याजातीने आपली वेदना करंगळीने दाखवण्याचा अधिकार आपल्या समाजाने तिला दिला नव्हता. विचारांची तंद्री तोडताना पहाटेच्या वाऱ्यात ही रमाच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. रुमालाने घाम टिपत, रस्त्यावरच्या खुणा मोजत, मनाला दिलासा देत ती शांत बसुन होती.थोड्या वेळाने गाडी तिच्या  स्टॉप वर पोहोचली. गाडीतून उतरून ती कॉलेजवर आली. कॉलेजवर तिचे सहकारी स्टेज समोर रांगोळी काढण्यासाठी तिची वाटच पाहत होते, सर्व कामगारनी एकत्र यावं आणि मुकादम येण्याची वाट पहावी या प्रमाणे झुंडी झुंडीने प्राध्यापक वर्ग थांबून होता. तिने आपली प्राथमिक गरज पूर्ण केली स्टाफ रूममध्ये येऊन काही वेळ खुर्चीवर विसावली.

         थोड्यावेळाने सर्वांना सर्व जबाबदारी देऊन आणि घेऊन ती थोडी निर्धास्त झाली, तोपर्यंत रांगोळीसाठी तिला बोलवण्यात आलं खरंतर या साडीवर आता रांगोळी बसून घालणं तिच्या जिवावर आले होते पण पर्याय नव्हता, गडीमाणूस तर रांगोळी घालू शकत नव्हता आणि ती बाई होती तिने मुलींना सोबत घेऊन सुंदर रांगोळी काढली त्याच्यामध्ये रंग भरताना आपल्या जीवनातील  अनेक रंग बेरंग झाले असले तरी रांगोळीतील रंग संगतीला तिने बेरंग होऊ दिले नव्हते, नंतर ती स्टाफरूममध्ये आली आपल्या जवळच्या गजऱ्याच्या पिशवीवर तिची नजर होती,मोठ्या उत्साहाने गजर्याची एक लड तिने सावंत  मॅडम ना दिली. लेडीज रूमच्या आरशासमोर बसत तिने यंत्रवत सर्व मेकअपचे साहित्य बाहेर काढले.खर तर नटण्ं, मेकअप करण्ं  हा तिच्या आवडीचा भाग परंतु अलीकडे तो तिला जबरदस्तीचा, औपचारिकतेचा वाटू लागला होता. "बाई" म्हणजे नटण्ं.....! हर जणु लादल गेले आहे का..? असं तिला वाटायचं. मग त्यानंतरच्या त्या नजरा ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, न्याहळणाऱ्या, ओरडणाऱ्या अन  टोचणाऱ्याही....! तरीही तिने स्वतःला तयार केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ही तिच्याकडेच होते,त्याची तयारी करून ती कार्यक्रमासाठी तयार झाली.

          कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या प्रमुख मार्गदर्शनासाठी उठले. बरचं काही बोलून झाल्यावर स्वागत प्रास्ताविक करणाऱ्या सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून प्रा.रमा कानडे यांच्यावर बोलताना पाहुणे म्हणाले, "आज  मॅडमनी छान स्वागत आणि प्रास्ताविक केलं, नियोजनही त्यांनीच केलं आहे. महिलांनी आपल्याला कमी समजण्याची गरज नाही संधी समान असते स्त्री-पुरुषांनी खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे, सर्वांना समान संधी समान न्याय याप्रमाणे स्त्रियांनी आपले खांदे मजबूत करावे."रमा हे सारे मन लावून ऐकत होती. खांद्याला खांदा लावून तिचे खांदे मजबूत झालेत का नाही हे तिला माहीत नव्हतं पण खांद्यापासून खांदे  वाचविण्यासाठी तिला नेहमीच कसरत करावी लागत होती, अशा वेळी तिच्या एका खांद्यावर अपंग पवन, शाळकरी गीता,घरातील किचन अन महाविद्यालयाचा कार्यभार होता.  तर दुसर्‍या खांद्यावर वॉचमनची बेरकी नजर, रिक्षावाल्याचा हावरा स्पर्श, सहप्रवाशाचा असभ्यपणा,  वॉशरूमला बराच वेळ न गेल्याने गच्च भरलेले किडन्या, लाज, शर्म,हया, या बाई जातीला मिळालेल्या परंपरागत देणग्या... या ओझ्याने तिचे दोन्ही खांदे झुकलेले होते. अशातच टाळ्यांच्या आवाजाने रमाच्या विचारांची तंद्री तुटली,अनाहूतपणे ती ही व्यवस्थेच्या नावानं टाळ्या वाजवू लागली.


डॉ.सूरज चौगुले.इस्लामपूर
9371456928

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)