कथा - फ्रन्टलाइन - डॉ.सूरज चौगुले
"फ्रन्टलाइन"
डॉ सुरज चौगुले, इस्लामपूर
ओ.पी.डी. मध्ये दाखल झालेल्या प्रत्येक पेशंटची पहिली सलामी 'शारदा, आणि 'आरिफा' या दोघींशी व्हायची, येणाऱ्या प्रत्येक पेशंटची मेडिकल हिस्टरी व अन्य माहिती घेऊनच त्या दोघी या पेशंटना पुढे डॉक्टर कडे पाठवीत होत्या. खरंतर हे उलट व्हायला हवं होतं अगोदर पेशंट डॉक्टरकडे जायला हवा होता पण कोरोणाच्या धामधुमीत या सरकारी दवाखान्यात शारदा अन आरिफा या 'फ्रन्टलाइन'झाल्या होत्या. कोरोनाशी लढणारे आमचे डॉक्टर प्रथम आपल्या हाताखालची ढाल समोर करीत होते आणि या दोघी मोठ्या उत्साहाने याला सामोरे जात होत्या. अर्थात बाकीच्या नर्सही होत्या परंतु या दोघी जणू कोरोना स्पेशालिस्ट सारख्या वावरत होत्या. मुख्य डॉक्टर आणि सहाय्यक डॉक्टरही या दोघींचं तोंड भरून कौतुक करत होते, तर तर सहकारी डोळे मोडित त्यांच्या तोंडावर हसू आणि माघारी कटू गीत गात होते.
शारदाचा विवाह दीड वर्षापूर्वी झालेला परंतु दुर्दैवाने एका मोटरसायकल अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. पोटाला पोर नाही. तरीही पतीच्या आठवणी मात्र तिने जन्म दिलेल्या पोराप्रमाणे जतन करून ठेवल्या होत्या, त्यांनाच गोंजारत ती आपले दिवस काढीत होती. आरिफा दीड वर्षापूर्वीच नव्याने रूजू झालेली, अविवाहित होती. विधवा आई, मुलीच्या लग्नाची आस घेऊन अल्लाहला प्यारी झाली होती, तर आरिफा मात्र वर्किंग वुमन्स होस्टेलवर अन्य मुलींसोबत दिवस काढीत होती. लग्नाच्या बाजारातही एक नंबर, दोन नंबर असतो तीन नंबर आरिफा मात्र आपल्या साथीदाराच्या प्रतिक्षेत होती. दोघीही कामात जीव ओतून घ्यायच्या. एकीला पतीच्या हरवल्याच दुःख तर दूसरीला पती न गवसण्याचं दुःख, परंतु समदु:खी दोघी मात्र कामाच्या ठिकाणी आपले रडगाणे कधीच गात नव्हत्या. बाकीच्या नर्सेस जेव्हा एकत्र जमायच्या तेव्हा कौटुंबिक चर्चेला ऊत यायचा. आणि चर्चेचा शेवट मात्र," तुमच्या दोघीचं काय बाय एकटा जीव सदाशिव." या वाक्याने व्हायचा. अर्थात हा टोमणा होता की सहानुभूती काहीच कळत नव्हतं. आज ही लग्न होणं ही स्त्रियांसाठीची गौरवाची बाब आणि मुलं असण तर त्याहून सन्मानाची. त्यातल्या त्यात पहिला मुलगा म्हणजे जणू सुवर्णपदकच! या धारणा या चर्चेच्या मुळाशी असायच्या पण या दोघीही या चर्चेच्या पुढे गेल्या होत्या. त्यांना आपल्या कामातच धन्यता वाटत होती, नाही म्हटलं तर तीन नंबर वार्डमधील वार्ड बॉय 'अमित' कडे आरिफाच येण जाण होतं तीच काही तिच्या जीवनातील थोडीफार हिरवळ असावी.
अमित वार्ड बॉय म्हणून दोन वर्षापासून तिथे काम करीत होता. देखना - उंचापुरा, पण घरची आर्थिक परिस्थिती जमिनीवर लोळण घेणारी. कॉन्ट्रॅक्टची त्याची नोकरी. हे सारं असलं तरी आरिफा बद्दल त्याच्या मनाचा एक कोपरा ओला होता. बाकी सर्व कामे सरकारी कामकाजाला साजेशी असावी अशी चालली होती. कोरोनाचे थैमान या शहरातही पोहोचलं होत आणि सरकारी दवाखान्यात पेशंटचा ओघ सुरू झाला. दवाखाना प्रशासनाची बैठक झाली, कामाच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या, दवाखान्याची फ्रंटलाईन मध्ये शारदा आणि आरिफा या दोघी आल्या सुरुवातीला आवश्यक सर्व काळजी घेऊन दोघी खूप जबाबदारीने काम करीत होत्या पण जसजसे पेशंट वाढू लागले तसे खूपच तारांबळ उडत होती. आता तर दवाखान्यातून डॉक्टर आणि नर्स यांना घरी जाणं ही दुरापास्त झालं होतं. बारा बारा तास अन अठरा-अठरा तास ड्युटया सुरू होत्या, वर्तमानपत्रातून,"बारा तासांनंतर नर्सआईला भेटलेली चिमुरडीचा तर घरी जाऊन ही दारातूनच घरच्यांशी संपर्क साधणाऱ्या डॉक्टरांचा फोटो छापून येत होता. परंतु ज्यांच्या घरी वाट बघणार कोण नव्हतं आणि ज्यांनी दवाखानाच घर मानलं होतं त्या शारदा व आरिफाची चर्चा कोठेच नव्हती.
ज्याला- ज्याला घरी जाण्याची घाई होती त्या सर्व या दोघींना आपलं काम सोपऊन घरी जात होत्या तर चिखलात रुतून बसलेल्या बैलगाडी सारख्या या दोघीही आपल्या कामात रुतून बसलेल्या होत्या. ना घरची ओढ, ना आपल्या माणसाच्या काळजीचा सूर,घरी यावं म्हणून कोणी वाट बघणार नाही. ज्याच्यासाठी घरी जावं असंही जवळचं कुणी नाही. शारदा जवळ नवऱ्याच्या आठवणी तर आरिफा जवळ अमितची नजरानजर ! दोघी मग एकमेकीजवळ बकुळीच्या फुलासारख्या झडायच्या आणि आपल्याच आनंदाची फुलं आपल्या वट्ठयात घेऊन पुन्हा कामाला लागायच्या.प्रमुख डॉक्टरांनीही त्यांच्या प्राथमिक गरजा तिथेच पुरवण्याची सोय केली होती, कारण त्या फ्रन्टलाइन होत्या.
प्रत्येक येणारा पेशंट म्हणजे खरंतर या दोघींसाठी मृत्यूची भेटच होती परंतु या दोघीही त्या पेशंटला त्याच्या आयुष्याची भेट देण्यासाठी मोठ्या आव्हानांना सामोरे जात होत्या. बरे होऊन जाणार्या पेशंटला जितक्या आनंदाने टाळ्या वाजवून त्या विदा करीत होत्या, तितक्याच आनंदाने त्यांच्या जीवनाचा उत्सवही साजरा करीत होत्या. त्या दिवशी दाखल झालेला एक पेशंट आपल्या वॉर्डमध्ये एका अन्य नर्स सोबत चर्चा करीत होता, आपल्या मृत्युच्या भीतीने तो पार गळून गेला होता. एक सारखा रडत होता तेव्हा त्या नर्सने या दोघींना बोलवलं, त्या दोघी आता त्या दवाखान्यातील कोरूनायोद्धाच झाल्यासारख्या त्या पेशंटला लढायचं कसं हे सांगत होत्या, त्या वेळचा त्यांचा उत्साह आणि जगण्याबद्दल ची प्रचंड उर्मी सर्वांनाच आस्वस्त करणारी होती.
एका दुपारी काही नर्स, डॉक्टर सहाय्यक डॉक्टरांच्या केबिनमध्ये जमल्या होत्या, समोरच्या वार्डात अमित काम करीत होता परंतु त्याचे कान मात्र या चर्चेकडे होते. एक नर्स त्या डॉक्टरांना विचारत होती," त्या शारदा आणि आरिफाच इतक का बर कौतुक? काम आम्हीपण करतोयच ना,?"
"अग त्यांना पुरस्कार मिळणार आहे"-- कुत्सित हसून दूसरी म्हणाली.
तोपर्यंत तिसरी बोलली," साहेबांनी पण सारीच सोय केली त्यांची?"
" अरे पण त्या फ्रन्टलाइन वर काम करतात"- डॉक्टर म्हणाले
पहिली नर्स-म्हणे फ्रन्टलाइन"
तोपर्यंत एकीनं जहरी फुत्कार सोडला,"अगं आहे ते काम तू कर की, आपलं काही कमीजास्त झालं तर आपल्या मागे रडणारे आहेत, त्यांच्या मागे कोण आहे रडणारे.करतात करु दे. कदाचित हाच विचार करून ही फ्रन्टलाइन बनवली असल. आपलं काम गप गुमान कर." हे ऐकून अमितच्या काळजात धस्स झालं. तो तितक्याच वेगाने पुढच्या वार्डात गेला, समोर त्या दोघी कामात होत्या, त्यांना बाजूला घेतल आणि बोलला," तुम्हाला फ्रन्टलाइन का केले माहित आहे का, तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या मागे रडणारं कोणी नाही म्हणून." त्या दोघींही निशब्द झाल्या. कुणीतरी आपल्या हाताला धरून घराबाहेर हाकलून देतय असं त्यांना वाटलं. अमितच वाक्य अंगात भूल दिल्याप्रमाणे झर झर झर त्यांच्या काळजात उतरल, दोघींच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहिल. एका कॉटला पकडून शारदा मटकन खाली बसली, तर आरिफाने स्टूलचा आधार घेतला. अमित बोलला ते वाक्य सत्य होतं पण इतकं उघड सत्य स्विकारायला त्यांचं मन तयार नव्हतं, रीतं असण्यापेक्षा रित्यापणाची कोणी जाणीव करून देणे हे काळजाला घरं पाडण्यासारखं होतं. दोघीही रडू लागल्या.आपल्या रित्यापणावर, आपल्या कोरडेपणावर. अमितच्याही डोळ्यात पाणी आलं नेमक्या त्या क्षणी आरिफाची नजर अमितच्या ओल्या डोळ्यावर पडली आणि तिच्या वाळवंटी काळजात आनंदाची कळी खुलली. तिने डोळे वर करून त्या डॉक्टरांच्या केबिन कडे पाहिले, जिथून मोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. तिच्या ओठावर हसू आलं, आणि डोळे जणू त्या सर्वांना सांगत होते की," कोण म्हणतं माझ्यासाठी रडणारं कोणी नाही?"
डॉ.सूरज चौगुले.
इस्लामपूर.9371456928

Comments
Post a Comment