कथा - लाँकडाऊन - सौ.शुभांगी लेले

                              लाँकडाऊन

   टीव्हीवर बातम्या सुरु होत्या.त्याबरोबरीनं बघणाऱ्यांची चर्चाही सरु होती.कुठे कुठे लाँकडाऊन उठले याची प्रत्येकालाच उत्सुकता होती.
     अनुनं हळूच हाँलमधे डोकावून विचारलं "अहो...कर्नाटकचं लाँकडाऊन उठलं का?त्यावर त्यानं वाईट तोंड करत नन्नाची मान  डोलवली.तसं अनुनं एवढसं तोंड करुन स्वयंपाकात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात तिचा मुलगा आत येऊन म्हणाला " आज काय करतीयंस जेवायला? "  तसा तिचा आवरुन धरलेला राग बाहेर पडला."रोज काय नवीन करायचं असतं?आता मलाच खा." असं म्हणत ती रागानं खोलीत निघून गेली.नवऱ्याच्या ते लगेचच लक्षांत आलं. तिच्या पाठोपाठ तोही खोलीत गेला.तशी ती भडकली.म्हणाली "सगळं करुन ठेवलंय ते खा.मला भूक नाही.जा तुम्ही.तसा तो म्हणाला " पण इतकं झालंय तरी काय? आत्तापर्यततर ठीक होतीस.हे ही खरं आहे म्हणा,छोट्या छोट्या कारणानं रुसुन बसण्यातली अनु कधीच नव्हती.डोळे पुसत पुसत अनु म्हणाली, या कोरोनालासुद्धा आत्ताच यायचं होतं का!नेमका मार्च गाठलानं.अगदी आँडीट टाईम.मेला जूनमध्ये आला असता तर काय बिघडत होतं.तो समजूत काढत म्हणाला,अगं संकटं काय सांगून येतात का?आजच एकदम काय झालं तुला?आपण 2/3 महिने व्यवस्थीत काढली ना!मग आत्ताच काय झालं?तसं अनु म्हणाली मार्च एप्रिल हे परीक्षेचेच दिवस होते ना.पण मे महिना...ओ हो म्हणजे माहेरी जायचा महिना असंच ना?असं तिचं वाक्य तोडत नवरा म्हणाला.अरेरे या करोनामुळं माहेरी जाता येत नाही हे दु:ख आहे तर.खरंच आत्ता तू खरंतर माहेरी असायचीस.बघता बघता शाळासुरु होतील.त्याचं हसणं बघून अनु जास्तच चिडली.रागानं म्हणाली"जा, आता मी माहेरी गेलीय असं समजा.मी कांहीच काम करणार नाही."आणि पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे तिनं पुसले.तसा तो हसत हसत बाहेर पडला आणि तिला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाला " आई, अनु माहेरी गेली गं" आईच्या प्रश्नार्थक मुद्रेला डोळे मिचकवून त्याने उत्तर दिले.अनुच्या सासुबाईंच्या ते लगेचच लक्षांत आलं.त्या हसत म्हणाल्या बरं झालं बाई.मे महिना हक्काचा गं बाई बाईचा.जाऊ दे.त्यानी अनुला बोलावलं म्हणाल्या बैस इथं.ही छान आयडीया दिलीस मला.आत्तापासून तू माहेरी आहेस असं समज.आणि तशीच रहा.मी ही आई होण्याचा प्रयत्न करीन.चला ठरलंतर मग वेळ सुरु होतीय आत्ता.तशी रडता रडता अनु हसली.नुसतं "माहेर"म्हंटलंतरी स्त्रीचा चेहरा केवढा खुलतो नाही.उत्साहानं अनु पानं घ्यायला उठली.तशा सासुबाई म्हणाल्या बैस तू.मी करते सगळं.अनुपण गमतीनं खुर्चीवर बसली.तेवढ्यात आईबरोबरचा संवाद तिला आठवला.खुर्चीत बसलेलं बघून आई म्हणायची,अनु उठ बाई आता.तू केलेली चटणी तुझ्या बाबांना खूप आवडते ती कर बरं मग पानं घे सगळे एकदम बसु या.पण आईनं ऊठ म्हंटल्याचं आपल्याला काहीच वाटत नाही.पण सासुनं म्हंटलं तर....तू बैस  मी घेते पानं हे सासुबाईंचं बोलणं तिला कसंतरीच वाटलं. ती पटकन् उठली . तसा तिचा नवरा म्हणाला अगं बैस गं. माहेरी आहेस ना.आई करेल सारं.खरंतर हे सगळं सगळ्याचं मनापासून चालल होतं.तरीही तिला हे स्विकारणं जड जात होतं.खरंतर अनुच्या लग्नाला  चांगली 15 वर्ष झाली होती.दुधात साखर विरघळावी तशी ती सासरी रमली होती.आणि माहेरी गेलीतरी 8/10दिवसाच्यावर ती कधीच रहात नव्हती.तिला माहीत होतं.माहेरी फार राहीलं तर माहेरी किंमत कमी होते.शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या भुवया उंचावतात.माहेरच्यांना मुलगी पुन्हा केव्हा माहेरी येते याची ओढ लागायला हवी.भावजयीनं म्हणावं वन्सं कधी येताय?तरच माहेरची मजा आहे.गोडी आहे.सासुबाई गंमतीनं म्हणायच्या आम्ही वर जायची वेळ आली.आता कुठलं आम्हाला माहेर?म्हणजे बाई म्हातारी झाली तरी माहेर असावसं वाटतं.अशी माहेरची महती.
   त्यानंतर दिवसभर सासुबाईनी तिला कुठल्याच कामाला हात लावू दिला नाही.तीही गंमतीनं मोबाईलवर गप्पा मारु  लागली.त्याच वेळी तिला आईचे शब्द आठवले.अनु किती वेळ मोबाईलवर बोलतेस?सासरी असंच करतेस का?हे बोलणं तिला खटकलं नव्हतं.पण विचार आला की हेच सासुबाई बोलल्या असत्या तर...तिच्या सासुबाई नेहमी म्हणायच्या  हल्लीचा काळ म्हणजे सून घरी आली की सासुनं सूनवास स्वत:च लावून घ्यायचा.का तर  मुलाला सुख लागावं म्हणून.अनुनं पट्दिशी मोबाईल ठेवला.
  आज माहेरपणाचा दुसरा दिवस होता.सासुबाईनी सगळ्याना चहा करुन दिला होता.अनु थोडी उशीराच उठून आली.तश्या सासुबाई म्हणाल्या बैस अनु.देते तुला चहा.तसा नवरा म्हणाला बैस बैस.माहेरी आहेस ना.करेल आई चहा.तिला थोडं अवघडल्यासारखंच झालं.
   चहा पुढ्यात ठेवता ठेवता  सासुबाईनी विचारलं अनु काय करु गं जेवणात.तसं तिचं मन माहेरी गेलं वाटलं आई म्हंटली असती  काय करुया जेवणात?आपली फर्माईश पुरी करण्यासाठी आपणही हातभार लावला असता.तरीही ती म्हणाली ,काय करु या?तश्या सासुबाई म्हणाल्या तू नव्हेस.मी करणार आहे.अनु थोडी हिरमुसली.केर काढण्यासाठी तिनं झाडू हातात घेतला.तसा नवरा धांवत आला.राणीसाहेब बसा बसा. आज मी केर काढणार आहे.तेवढ्यात मुलगाही आंघोळ करुन आला.कपडे शोधायला लागला.तशी अनु म्हणाली थांब मी देते.तो म्हणाला नको नको.मी आता मोठा झालोय ना.त्यात तू माहेरी गेलीयंस ना.आणि हसू लागला. नाष्टा चहाही आजीकडूनच घेतला.अनुचे सासरे कालपासून सगळं पहात होते.ते म्हणाले .अनु सगळे गंमतीनं पण मनापासून करतायत तर तूही एन्जाँय कर ना.तिनं हसण्याचा प्रयत्न केला.आणि खोलीकडे धूम ठोकली.विचार करु लागली.एकच वाक्य सासरी आणि माहेरी वेगळा अर्थ का निर्माण करते.तिचे डोळे भरून आले.आपल्या कुटुंबात आपापल्यापरीने सगळेच एकमेकावर प्रेम करतात हे जाणवले.तेवढ्यात तिचा नवरा खोलीत आला. तशी  ती डोळे पुसत म्हणाली.अहो ऐकलं का,मी सासरी  आलेय.तसा नवरा आईला ऐकू जाईल असं ओरडला.आई अनु माहेरहून आली गं.तसं सासुबाईनी हातातलं भांड कट्यावर ठेवलं नी म्हणाल्या बरं झालं बाई आलीस. खूप वाटतं गं पण सगळी कामं झेपत नाहीत आता.आणि हो.जसं पैशाचं सोंग आणता येत नाही,तसं सासुला सुनेची आई होण्याचे सोंग आणता येत नाही.शेवटी आई ती आईच तीला दुसरी उपमा नाही.हुश्श करत सासुबाईनी गुडघ्यावर हात ठेवत खुर्चीत बसल्या आणि हसंतमुखाने अनुने स्वयंपाकघराचा ताबा घेतला.

        सौ.शुभांगी लेले.

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)