कथा - मोहराचा आंबा - डॉ.सूरज चौगुले
'मोहराचा आंबा'
डॉ. सूरज चौगुले, इस्लामपूर
शिवराम अण्णांचं आंब्याचं झाड म्हणजे साऱ्या गावातील मुलांसाठी माहेर घरच होतं. गावापासून काही अंतर दक्षिणेला लोणार ओढा पार करून पुढे गेलं की सुतारकीचा पांदीचा रस्ता थेट शिवराम अण्णांच्या मळ्यात पोहोचायचा. लोणार ओढ्याचं पाणी सहा महिने तरी टिकून असायचं त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली गर्द हिरवाई पाखरांसाठी पर्वणीच असायची, ओढ्याच्या गावाकडच्या बाजूला मराठी शाळा, शिकणारी मुलं शाळेत आणि शिकण्यासाठी म्हणून शाळेत आलेली मुलं एकतर ओढ्यात नाहीतर सुतारकीच्या पांदीतून सरळ शिवराम अण्णांच्या आंब्याखाली सर्रास दिसून येत असत.
अण्णांच्या आंब्याच्या झाडाची ओढ मुलांना इतकी लागायची की रविवारचा संपूर्ण दिवस त्या झाडावर मुलांची किलबिलाट असायची, ते झाड सुद्धा तितकच लेकुरवाळ होतं लांबून पाहिलं तर काळ्याभोर धर्तीवर एखादी हिरवीगार अर्धगोलाकार डेरेदार शीला ठेवावी असा त्याचा आकार होता. लांबून झाडाचा बुंधा कधी दिसलाच नाही. सर्कशीतील तंबूप्रमाणे आकाशात उंच जाऊनही पुन्हा मातीची ओढ घेत त्याच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या, जमिनीपासून सहा-सात फूट उंची वरूनच त्याला फांद्या फुटलेल्या त्यामुळे झाडावर सहज चढता यायचं या फांदीवरून त्या फांदीवर जाताना मुलं जनु हमरस्त्यावरून चालल्यासारखी चालायची, अन मग इथेच लगोरी, पाटशिवनी, आट्यापाट्या अन जगाच्या खेळाच्या यादीत नसलेले अनेक खेळ याठिकाणी खेळले जायचे. गडद सावलीने या आंब्याची पाठ कधी सोडलीच नाही. शेताच्या एका कोपऱ्यात पाच एक गुंठ्यात हे झाड आपला घोळदार हिरवा झगा नेसून बसलेलं.
गावातील बऱ्याच जणांनी अण्णांना सल्ला दिला होता की 'झाड ढाकलून घ्या', त्याच्या फांद्या ढाकलून घ्या,' एवढी जमीन पडून राहणं अण्णांना परवडणारं नव्हतं परंतु अण्णांनी परवढण्याचा कधी विचारच केला नव्हता, "माझ्या आबा-आज्ज्या पासून हे असंच झाड आहे, याच्या खांद्यावर आमच्या चार एक डूया खेळल्यात आणि याच्यावर कुऱ्हाड ! नाही रं बाबा असं कवाच होणार नाही," अण्णा जेवढे भावनिक होते तेवढेच मायाळू होते, लहान मुलांवर त्याचे खुप प्रेम, शिवारात फिरणाऱ्या अस्सल नागापासून ते दावणीतील जित्राबा पर्यंत त्यांनी कधीच कोणावर हात उगारला नव्हता, आंब्याच्या सावलीत खेळणाऱ्या मुलांवर आणि झाडावरच्या पाखरांवर अण्णा तितकेच प्रेम करायचे. त्याला कारणही तसंच होतं अण्णांची दोन मुलं खेळत्या बागडत्या वयातच देवाघरी गेली होती, त्याला खूप वर्ष झाली.' सुट्टी लागली होती म्हणून दोन मुलं अट्टाहास करूनआई सोबत मामाच्या गावाला गेली होती तर अण्णांचा तिसरा सर्वात मोठा मुलगा मात्र अण्णांच्या आग्रहानं त्यांच्या जवळच थांबला होता. दुष्काळी गाव कधी नव्हे ते कॅनालला पाणी सोडलेलं, विहरीत पोहणाऱ्या या मुलांना वाहत्या पाण्याचा काहीच अंदाज आला नाही. दुष्काळात हिरवाई घेऊन आलेल्या कॅनॉलच्या पाण्याने शिवराम अण्णांची हिरवळ मात्र करपून टाकली होती. अण्णांची दोन्ही मुलं या कॅनॉलच्या पाण्यात वाहून गेली आणि मृत्युमुखी पडली . आता अण्णांचा एकुलता एक मुलगा शिकून-सवरून शहरात नोकरीला गेला होता त्यामुळे अण्णा आपल्या उतारवयात बायको सोबत गावात राहत होते. दिवसभर मळा, शिवारातील उडणारी पाखरं अन आंब्या खाली बागडणारी पोरं यांच्या संगतीने अण्णांच्या दिवस रात्रीची चक्रे फिरत होती.
अण्णांच्या आंब्याच्या झाडाचा मोहर म्हणजे गावातल्या पोरांसाठी आनंदाची पर्वणीच होती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आंब्याला मोहर यायला सुरुवात व्हायची नवी सोनेरी पालवी पुढे पुढे जायची आणि या पालवीचा पाठलाग करीत जुन्या ढहाळ्यावर मोहर फुलू लागायचा. हिरव्यागर्द पानांच्या जागेवर त्यांच्या देठातून उमलणाऱ्या मोहरांचा हिरवा पिवळा पदर कधी पांगरून जायचा हे कळायचं नाही. ओढ्याचा काठ ओलांडून सुतार पांदीत शिरताच या मोहराचा गंध साऱ्या परीसरात दरवळायचा, सगळ्या शिवारात मग या आंब्याचा रुबाब काही वेगळाच असायचा. आता लांबून पाहिलं तर मोहरलेले हे झाड म्हणजे एखाद्या मातृत्व पोटात घेऊन अवघडलेल्या स्त्री सारखे जाणवायचं, मोहराच अवघडलंपण त्याच्या फांद्या फांद्यातून दिसायचं, मग त्याच हलण -डुलण बंद व्हायचं. मातृत्वाच्या भरल्यापणाच्या साऱ्या खुणा त्याच्या अंगात दिसायच्या, मोहराने धुंद झालेल्या मधमाशा मात्र मधुकण मिळवण्यासाठी त्याच्या अंगाखांद्यावर गुणगुणत राहायच्या. आंब्याचं मोहोरनं आणि मुलांचं वागणं यांच्यामध्ये एक अनोखं नातं होतं, जाणती पोरं त्यावेळी आपल्या सवंगड्यांना ताकीद द्यायची की आता मात्र कुणी झाडावर खेळण्यासाठी चढायचं नाही मोहर झडतो पण काही वांड मुलं मात्र या गोष्टी कडे कानाडोळा करीत झाडावर चढायची, मस्तीही करायची, अवघडलेल्या फांद्यांवर खेळायची सुद्धा परंतु अवघडलेल्या अवस्थेत ही एखाद्या लेकरानं आपल्या माईला उचलून घेण्याचा हट्ट करीत बिलगून राहावं अशी अवस्था झाडाची आणि मुलांची व्हायची,
मोहरलेले झाड फळाला यायचं आणि कैऱ्यांनी लगडलेलं हे झाड पुन्हा नवा हिरवा शालू पांघरायचं. शिवराम अण्णांच्या आंब्याचा आंबा खाल्ला नाही असं कदाचित गावात एकही पोरं नसेल, त्यावेळी प्रत्येक मुलाच्या खिशात चटणी, मीट आणि आंब्याची कैरी सर्रास असायची याबाबत आण्णांनी कधीच तक्रार केली नाही आंब्याच्या डहाळ्याचा पसारा जितका मोठा होता तितकंच अण्णांचं मन मोठं होतं.
वेळ आणि वय चक्राप्रमाणे पळत असतं, त्याची गती निसर्ग कायम राखतो. अण्णा आता उतरतीकडे पोहोचलेले आणि त्यांचे शरीर आता थकलेलं होतं, दिवसभर त्या आंब्याच्या बुंध्याला टेकून बसलेले मुलांच्याच मदतीनं सायंकाळी घरी जायचे, अलीकडे त्यांचं शेताकडे येणेही आता व्हायचं नाही. अशातच अण्णांच्या शरीराच्या तक्रारी वाढल्या आणि इलाजासाठी अण्णांच्या मुलांने त्यांना आपल्याकडे शहरात नेले. दरम्यान शहरातील आपल्या साहेबांना घेऊन अण्णांचा मुलगा दोन ते तीन वेळा गावाकडे आला आणि आवर्जून साहेबांना सुतारकी च्या पांदीतून आपल्या आंब्याखालच्या च्या वस्तीवर घेऊन आला. शेजारी-पाजाऱ्यानी विचारले सुद्धा परंतु 'काही नाही सहज आलोय' म्हणून मुलांन बोलणं टाळलं, परंतु शेवटी गावाला चाहूल लागली की अण्णाच्या मुलांनं आपली जमीन आणि ते डेरेदार झाड आपल्या साहेबाला विकून टाकलं, साहेब आता त्या ठिकाणी टुमदार फार्महाउस बांधणार आहेत.
आता साहेबांच्या चक्रा शेताकडे जश्या वाढु लागल्या तशा त्यांच्यासोबत सिमेंटचे खांब, काटेदार कंपाउंड ची जाळी अन नक्षीदार गेट हे अण्णांच्या शेतात आलं ते डेरेदार झाड आणि अण्णांच्या काळजाचा काळाभोर जमिनीचा तुकडा काटेदार तारेच्या कुंपणाने आणि सिमेंटच्या खांबांनी बंदिस्त झालं. पांदीच्या कडेला नक्षीदार गेट बसलं अन चिमुकल्यांची पावलं आता कुंपणाबाहेरच थबकली बंदिस्त डेरेदार आंब्याचा मोह मुलांना सुटला नाही पण काटेदार कुंपणाने त्यांच्या पायाला बांधून ठेवलं होतं तर इकडे खोलवर रुजलेल्या मुळ्या त्या झाडाला कुंपणाबाहेर पडू देत नव्हत्या, मुलांच्या किलबिलाटात मोहरणार ते झाड आता मूकं झालं होतं. लांबवर मराठी शाळेच्या पटांगणात बागडणाऱ्या मुलांना ते लांबूनच पाहत होतं परंतु त्या मुलांच्या पावलांची चाहूल आता त्याच्या बधीर कानांना ऐकू येत नव्हती.
त्या वर्षीच्या ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये आंब्याला नवी पालवी आली पिवळ्या पालवीचा पाटलाग हिरवाईने केला, हिरव्या कोवळ्या फांद्यावर देठा देठातून मोहरही बहरला, मधमाशांही खांद्यांवर गुणगुणू लागल्या, परंतु मुलांची पावलं मात्र कुंपणाबाहेर अडून राहिली मोहराचा गंध भलताच दरवळत होता आणि या गंधाला शोधीत कुंपणातून नजर चुकवीत आत येणाऱ्या मुलांना वॉचमन करवी मारही बसत होता. त्यादिवशी तर दोन मुलं वॉचमन ची नजर चुकवत तारेच्या कुंपणातून आपल्या अंगाचा कानोला करीत आत आली, काहीकाळ आंब्याच्या फांद्यांवर खेळली परंतु वॉचमनची नजर जाताच तारेच्या कुंपणातून पळताना रक्तबंबाळ झाली. मुलांची ती वेदना आणि पाठीतून आलेले रक्त आपल्या हिरव्या डोळ्यानी ते झाड पहात होतं आणि मुक्यानेच गहिवरल होतं.
त्या वर्षी मोहरलेले ते आंब्याचं झाड फळाला मात्र आलच नाही. आंब्याचा मोहर अचानक झडू लागला आणि हिरव्यागर्द झाडावरचा मोहर करपून फांद्यांवर काळे डाग जागोजागी दिसू लागले, एखाद्या सुंदर चेहऱ्यावर कोड फुटावा, काळ्यामातीत मीठ फुटावं तशाच प्रकारे मोहरलेल्या आंब्यावर काळे डाग दिसू लागले. जमिनीवर झडलेल्या मोहराचा बिछाना पडला आणि बघताबघता झाड उघड झालं. त्या वर्षी नव्हे तर पुढच्या अनेक वर्षांपर्यंत ते झाड कधी फळाला आलच नाही उंचावरून मराठी शाळेच्या पटांगणात दिसणाऱ्या चिमुकल्यांना पाहून ते आशेने मोहरायच खरं परंतु त्या चिमुकल्यांच्या पाठीवर पडणाऱ्या मारामुळे ते पुन्हा करपून जायचं. गेली कित्येक वर्ष ते झाड मुलाच्या पावलांची वाट पाहतंय. आता फक्त मोहरणारं ते आंब्याचं झाड गावात आणि परिसरात 'मोहराचं आंबा' म्हणूनच ओळखला जातो.
डॉ. सूरज चौगुले,( इस्लामपूर )
9371456928.

Mast
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDelete