कथा - नॉनव्हेज - सचिन देशपांडे
*सचिन देशपांडे*
गुळ - तुप पोळी खाऊन ऊठला अभय ताटावरुन. आज सलग तिसरा दिवस होता अनुयाने भाजी, आमटी, भात वैगरे काहिच न करण्याचा. काल शिकरण पोळी खाल्लेली त्याने... तर परवा दही - साखर पोळी. मुळात अभयचा कटकट्या स्वभाव अजिबातच नव्हता... आणि जेवणाबाबतीत तर अगदीच चोखंदळ नव्हता तो. दुपारी डबा ऊघडल्यावर... नी रात्री ताट समोर आल्यानंतर कळत असे त्याला, की स्वैपाक काय आहे. कधी कुठली फर्माईशही अभयने केली नव्हती अनुयाकडे, लग्नाच्या गेल्या बारा - तेरा वर्षांत. अनुया मुळातच प्रचंड सुगरण होती... मुख्य म्हणजे स्वैपाकात, मनापासून रस असणारी होती. त्यामुळेच तिच्याकडून आत्तापर्यंत... कधीच हेळसांड झाली नव्हती, घरच्यांच्या जेवणा - खाण्याची. अभयने भले एकदाही कौतुक केलं नसेल, अनुयाच्या स्वैपाकाचं... पण कधी एका शब्दाने खोडीही काढली नव्हती, तिने केलेल्या जेवणात. ऊदर भरणाला खर्या अर्थाने, यज्ञ कर्म जाणणार्यातला होता अभय. ही कौतुकं, खोड्या, फर्माईशींची आघाडी सांभाळत असत, त्यांचे दोन लेक... आणि लेकांच्या आडून त्यांची आजी, म्हणजेच अभयची आई... रोहिणी.
रोहिणीबाई प्रचंड 'फुडी' कॅटेगरीतल्या... जिभ ही चोचले पुरवायलाच तोंडात बसवलेली असते, यावर ठाम विश्वास असलेल्या. लहानपणी त्यांच्या वडिलांच्या बदल्यांमुळे... बारा गावचं जेवण जेवलेल्या. म्हणजे आडनाव फाटक असुनही... अगदी नाॅनव्हेजसाठीही तोंडाचं 'फाटक', सदैव ऊघडं ठेवणार्या. पण आई कट्टर सोवळं - ओवळं मानणार्यातली असल्याने... रोहिणीबाई अगदी छोट्या असल्यापासूनच, बाबा त्यांना बाहेर घेऊन जात... महिन्यातून एकदा नाॅनव्हेज खायला. तर अशा ह्या रोहिणीबाईंच्या, लग्नाचे वांदे झाले होते. जोशी, वर्तक, लेले, आपटे कुलोत्पन्न... कसा बरं सहन करावेत पहायला आलेल्या मुलीने विचारलेला प्रश्न... "नाॅनव्हेज आवडतं का?". पण अखेरीस लग्नाळू रोहिणीला... तिच्या प्रश्नावर बाह्या सरसावत ऊत्तर देणारा, एकजण भेटलाच... देवधरांचा प्रकाश. मरिन ईंजिनिअर असलेला प्रकाश, नाॅनव्हेज खाण्यात एक्स्पर्ट होता. त्यामुळे बसल्याजागीच डोळ्यांवाटे, होकार दिला होता प्रकाशला रोहिणीने. दोन्ही घरांतून पसंता - पसंती झाली होती. पुढच्या वाटाघाटींसाठी बैठक ठरणारच होती की, प्रकाश देवधरचा ट्रेन अॅक्सिडेंट झाला. त्यात त्याचा ऊजवा हात, समुळ तुटला... आणि याचं पर्यावसान साहजिकच, प्रकाश - रोहिणीचं लग्न तुटण्यात झालं. अर्थातच दोन्हीकडच्या मोठ्यांनीच, हे परस्पर सामंजस्याने ठरवलं होतं... रोहिणी - प्रकाशला न विचारता. रोहिणीचं पुढे दोनच महिन्यात लग्न ठरलं, माधव अभ्यंकर याच्याशी... ज्याने आयुष्यात कधी अंडही खाल्ल नव्हतं... आणि जेवणात अगदीच, तुटपुंज्या आवडी - निवडी होत्या त्याच्या... जे कळून रोहिणीने हसतच, कपाळावर हात मारुन घेतलेला स्वतःच्या. आणि आता रोहिणीबाईंचा एकुलता एक चिरंजीव अभयही, अगदी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊनच निपजलेला. शंभर टक्के शाकाहारी... नी जेवणासाठी जिवंत नाही, तर जिवंत रहाण्यासाठी जेवणार्यातला.
तर... गेल्या तीन दिवसांचा अनुयाने केलेला स्वैपाक बघून, अभय जरा काळजीतच पडला... की ऊद्या ताटात मोरांबा - पोळी आली, तर आपल्या आईच्या भावनांचा ऊद्रेक वैगरे नको व्हायला. म्हणून त्याने वेळीच विचारलं अनुयाला, सध्याच्या ह्या स्वैपाकातील शाॅर्टकटचं कारण... तेव्हा अनुया म्हणाली...
"मी तुझ्याशी बोलणारच होते अरे या संदर्भात... आई गेल्यानंतर बाबा अगदीच एकटे पडलेत रे... फारच आबाळ करुन घेतलेली त्यांनी जेवणाची... गेले तीन दिवस आॅफिसमधून सुटल्यावर, मी बाबांकडे जातेय... त्यांचं स्वैपाक - पाणी करतेय... नी येतेय घरी... त्यामुळे जराशी ओढाताण होतेय अरे... पण मला कळतंय की... बाबांना ऊपासमार होऊ न देण्याच्या नादात, मी आपल्या घरी काॅम्प्रोमाईज करतेय... मला अजून दोनेक दिवस दे अभी... मी माझे ड्युटी हावर्स बदलून मागितलेत... तासभर लवकर निघेन सकाळी... नी परतेनही तासभर लवकरच... मग होईल दोन्हीकडचं मॅनेज... बाबांना मी एकदम तोडू नाही शकणार अरे... एकतर ते आयुष्यभर आईवर, ईतके डिपेन्ड होते... यु नो हिज प्राॅब्लेम ना".
अभय त्याच्या मुळातच संतपदाकडे जाणार्या स्वभावानुसार, काहीच न बोलता वळून निघतच होता... की त्याला आई दिसली त्याची दारात ऊभी. आईंना बघून मग अनुयाही गप्प झाली. रोहिणीबाई आत आल्या... नी बोलू लागल्या...
"अनुया तुझी आई आत्ता महिना झाला गेलीये... पण अभयचे बाबा दहा वर्षांपुर्वी गेले... तेव्हापासून मी ही एकटीच तर रहातेय... तुम्ही घरचे लोक नावाला असता गं आजुबाजुला... पण आपल्या जोडिदाराच्या जाण्याने आलेला एकटेपणा, नाही घालवू शकत तुम्ही... मुलं - बाळं ही 'पेन किलर्स' असतात... तात्पुरती 'पेन' विसरायला लावणारी... पण काही वेळाने 'ती' लागतेच पुन्हा ठसठसू... तुझ्या आॅफिसमधून तासभर लवकर निघण्याने, किंवा तू बाबांचा स्वैपाक करण्याने... त्यांच्या एकटेपणाच्या जखमा भरतील असं वाटतं तुला?... हां... वेदना काही काळाकरता कमी जाणवतील त्यांना... पण हा खरंच ऊपाय वाटतोय तुला?... आणि आत्ता जर तुझं माहेर लांब असतं तर?".
अनुया खाली मान घालून, रडत होती फक्त. तिला साधारण कल्पना आली होती, की आईंना हे आपलं रोज बाबांकडे जाणं पटलेलं नाही. तिने मदतीसाठी अभयकडे पाहिलं... अभयने डोळे मिटत, मान हलवत अनुयाला मुकपणे दिलासा दिला... "मी बोलतो आईशी" असा. तेवढ्यात रोहिणीबाईंनी एक फोन लावला त्यांच्या मोबाईल वरुन... नी त्या बोलू लागल्या...
"हॅलो... हा नमस्कार... मी श्रीमती अभ्यंकर बोलतीये... अभयची आई... अनुयाचे बाबा... तुम्हाला एक सांगायचं होतं... ऊद्याच्या ऊद्या तुमची बॅग, बॅगा जे काही असेल ते भरा... आणि पायात चपला सरकावून तयार रहा... ऊद्याच अभय - अनुया तुम्हाला न्यायला येतील... तुम्ही आता आमच्याकडे रहायचंयत कायमचं... मुलगी, जावई, नातवंडांबरोबर... जे गेले आपल्याला सोडून, त्यांना त्यावेळीच मोक्ष मिळतो... जेव्हा त्यांना दिसतं की, आपल्यामागे आपल्या माणसाचं बस्तान पुन्हा ठीक बसलंय... तेव्हा ऊगिच अनुयाच्या आईच्या आत्म्याला, भटकत ठेऊ नका... ऊद्याच्या ऊद्या ईथे या... तुमची... तुमची 'बायको' होता होता राहिलेली, तुमची 'विहिणबाई' आग्रह करतेय तुम्हाला... श्रीयुत प्रकाश देवधर... ताबडतोब या ईथे... आपल्या लेकांची सोयरीक ठरली, तेव्हा मी तुम्हाला हळूच एक प्रश्न विचारला होता... की तुमची लेक नाॅनव्हेज खाते का?... तर तुम्ही म्हणालेलात की, छे हो... आईवर गेलीये... केकही एगलेस खाते... मी कपाळावर जोराचा हात मारलेला ते ऐकून... आणि आपण दोघेही चिक्कार हसलेलो... आपापल्या गोंधळलेल्या जोडीदारांना तिथल्यातीथे सांगुन टाकलेली आपण, आपल्यातली गंमत... पण आपल्या पोरांना माहिती नाहिये अहो हे... आणि आता ती दोघंही पार गोंधळून, बघतायत माझ्याकडे... तेव्हा आता फोन ठेवते, नी पहिलं सांगून टाकते त्यांना... तुम्ही या ऊद्या... ईथे जवळंच गोमांतक आहे... मस्त सागुती - वडे चेपू... वर्ष लोटली हो 'नाॅनव्हेज' खाऊन... ठेवते फोन... वाट बघतेय तुमची".
रोहिणीबाईंनी फोन ठेवला... नी भरलेल्या डोळ्यांनीच, खळखळून हसू लागल्या त्या. मुलाचा, सुनेचा आणि तोपर्यंत तिथे आलेल्या दोन्ही नातवंडांचा चेहरा... भांबावून जाण्याची हद्द गाठू पहात होता आता.
---सचिन श देशपांडे
'नाॅनव्हेज'

Comments
Post a Comment